मुंबई : मृणालताई गोरे उड्डाणपूल सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पूल वादात सापडला आहे. या पुलावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. पुलाची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे मंगळवारी येणार होत्या. मात्र त्याच्या आधीच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पुलाची पाहणी केली आणि महापौरांवर कुरघोडी केली. भाजपला फक्त पाटी लावायची घाई झाली आहे, अशी टीकाही पेडणेकर यांनी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपुलाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या पुलाच्या लोकार्पणापासूनच राजकारण रंगू लागले आहे. या पुलाच्या लोकार्पणाला प्रथेप्रमाणे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनाही बोलवण्यात आले होते. मात्र त्या पोहोचायच्या आतच या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या नव्याकोऱ्या पुलाच्या दुर्दशेबद्दल आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. पुलावरील खडी आणि ओबडधोबड पृष्ठभागाबद्दल समाजमाध्यमांवर टीका होऊ लागली. त्यामुळे मंगळवारी महापौर रितू तावडे यांनी या पुलाची पाहणी करण्याचे ठरवले होते. त्या साडेअकरा वाजता पुलाच्या ठिकाणी येणार होत्या. मात्र त्याच्याआधीच किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह पुलाच्या ठिकाणी पोहोचल्या. उद्घाटनाच्या वेळी हुकलेली संधी त्यांनी मंगळवारी साधली आणि महापौरांवर कुरघोडी केली.

आमची भीती वाटते म्हणून पाच मिनिटे आधी उद्घाटन केले

प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पुलाच्या कामाबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. आमची भीती वाटते म्हणून अकराला पाच मिनिटे असताना उद्घाटन उरकून घेतले. उद्धव ठाकरे यांची आठवण झाल्याशिवाय याचे राजकारण पुढे जात नाही, असाही टोला पेडणेकर यांनी लगावला. नावाची पाटी लावायची भाजपला घाई झाली आहे. पुलाचे काम नीट झाले की नाही हे आधी बघायला हवे होते. आता उद्घाटनानंतर येऊन काय उपयोग, असाही टोला त्यांनी महापौरांनी लगावला आहे.

वाढीव खर्चाबाबत जनतेला सांगा…

पुलाच्या मूळ खर्चात काम पूर्ण होईपर्यंत ४५ टक्क्यांनी वाढ झाली आणि हा प्रकल्प २४८ कोटींवर गेला. हा खर्च कोणासाठी वाढवला याची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत, अशीही मागणी पेडणेकर यांनी केली. आतापर्यंत ज्या निविदा भाजपने रद्द केल्या, त्या देखील खर्च वाढवून पुन्हा आणणार असल्याची टीका पेडणेकर यांनी केली. हमी कालावधी संपण्याच्या आधी या पुलाची अवस्था कशी होते ते बघा, असाही टोला पेडणेकर यांनी हाणला. कंत्राटदारांना नेमके काय शिक्षा करणार ते पण जाहीर करा, असाही इशारा पेडणेकर यांनी दिला.