scorecardresearch

वीज महागाईचा झटका? सरासरी २५ टक्के दरवाढीचा महावितरणचा आयोगाकडे प्रस्ताव

महानिर्मिती आणि महापारेषणनंतर महावितरण कंपनीनेही आयोगापुढे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे

msedcl proposal sent to state electricity regulatory commission for 25 percent hike in power tariff
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : ‘महावितरण’ने सुमारे ८६ हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पुढील दोन वर्षांत विक्रमी इंधन समायोजन आकारासह २५ टक्के दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. त्यानुसार, इंधन समायोजन आकारासह सध्याचा प्रति युनिट ७.७९ रुपये सरासरी दर २०२३-२४ मध्ये ८.९० रुपये, तर २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये होणार आहे. 

सध्याचा इंधन समायोजन अधिभार गृहीत धरून महावितरण कंपनीने हा वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाच्या मान्यतेनंतरच ही दरवाढ अमलात येईल. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह औद्योगिक, वाणिज्यिक आणि सर्वच संवर्ग आणि श्रेणींतील ग्राहकांवर पुढील दोन्ही आर्थिक वर्षांत किमान दहा टक्क्यांहून अधिक दरवाढीचा बोजा पडणार आहे.

महानिर्मिती आणि महापारेषणनंतर महावितरण कंपनीनेही आयोगापुढे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. वीजदरात आणि अन्य कारणांसाठी महावितरणच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे वीज आकाराबरोबरच वहन आणि स्थिर आकारातही वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

महावितरणच्या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षांत अपेक्षित असलेल्या ६७,६४४ कोटी रुपयांच्या तुटीच्या भरपाईची मागणी करण्यात आली आहे. महावितरणची सरासरी ३७ टक्के दरवाढीची मागणी आहे. वीज शुल्काचा अतिरिक्त बोजाही पडणार आहे.

इतकी प्रचंड दरवाढीची मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत प्रथमच करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक वीजदर महाराष्ट्रात असूनही सर्व सर्वसामान्य ग्राहकांना आणि उद्योगांना दरवाढीचा मोठा झटका बसणार असल्याचे राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

आयोगाने सन २०२२-२३ साठी सरासरी वीजदर ७.२७ रुपये प्रति युनिट मंजूर केला आहे. तथापि, इंधन समायोजन आकार गृहीत धरून हा दर ७.७९ रुपये प्रति युनिट दाखविण्यात आला आहे. या इंधन समायोजन आकारामध्ये अदानी वीज कंपनीचा वाटा मोठा आहे. महावितरणने सन २०२१-२२ मध्ये लागणाऱ्या एकूण विजेपैकी १८ टक्के वीज अदानी पॉवरकडून सरासरी ७.४३ रुपये प्रति युनिट दराने खरेदी केली आहे. महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी २०२३-२४ मध्ये ८.९० रुपये प्रति युनिट आणि २०२४-२५ मध्ये ९.९२ रुपये प्रति युनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी केली आहे. सरासरी वाढ अनुक्रमे १४ टक्के आणि ११ टक्के दाखविली आहे. ही ग्राहकांच्या डोळय़ांत धूळफेक करणारी आकडेवारी आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी २.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे ३७ टक्के आहे. वीज दरवाढ १० टक्क्यांहून अधिक असू नये, असा निर्णय वीज अपिलीय न्यायाधिकरणाने एका प्रकरणात दिला असल्याने आयोगाने ही दरवाढ मंजूर करू नये, अशी मागणी होगाडे यांनी केली.

विरोध करा : प्रताप होगाडे

वारेमाप खर्च, भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभारामुळे खर्च, गळती वाढत असून ग्राहकांनी या दरवाढीला जोरदार विरोध करावा आणि आयोगापुढे हरकती, सूचना दाखल कराव्यात. ही दरवाढ मान्य केल्यास राज्याच्या विकासावर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केली आहे.

घरगुती ग्राहकांवरील प्रस्तावित भार

युनिट            सध्याचा दर    २०२३-२४       २०२४-२५

०-१००               ४.०१        ४.५०           ५.१०

१०१-३००              ८.७९          १०             ११.५०

३०१-५००              १२.४२       १४.२०          १६.३०

५०० हून अधिक      ४.२१         १६.३०         १८.७०

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 02:49 IST