‘मनसे नगरसेवकाच्या इमारतीतील महाविद्यालयातच मराठीची गळचेपी’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध होताच डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हादरली. त्यांनी ताबडतोब तेथील रॉयल महाविद्यालयात धडक मोर्चा नेऊन तेथील शिक्षिका नंदिनी सावंत यांच्या तक्ररीची दखल घेत मराठी भाषेची होणारी गळचेपी, मराठी शिक्षकांना डावलल्याचा तसेच मराठी भाषेला दुय्यम दर्जा दखविणाऱ्या प्राचार्य दिनेशचंद्र तिवारी यांच्या विरोधात अध्यक्ष रजनीकांत शहा यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याप्रमाणे अध्यक्षांनी सावंत यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाची दखल घेऊन त्यांना अर्धवेळ नियुक्त केल्याचे पत्रक मागे घेतले. याखेरीज त्यांना पूर्णवेळ शिक्षिकेचा कार्यभार देऊन २०१२ व १३ चे पूर्ण वेतन देण्याचे मान्य केले व तसे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले.
प्राचार्य दिनेशचंद्र तिवारी यांची प्राचार्यपदावरून हकालपट्टी करण्याचे अध्यक्षांनी मान्य केले. १ मेपर्यन्त तिवारी यांना राजीनामा देण्यास त्यांनी फर्माविले आहे. तसेच मराठी भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहा यांनी सांगितले.  यावेळी मनसेचे शहर उपाघ्यक्ष समीर पालांजे, वेदप्रकाश पांडे व नगरसेवक प्राजक्त पोतदार, स्वानंद भणगे, ललित शिंदे, सिद्धेश कुलकर्णी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.