मनसेची फिनिक्स पक्ष्यासारखी राखेतून भरारी घेण्यासाठी पक्षबांधणी आणि पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला असून त्यानंतर मुंबईसह राज्यात लोकसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये उधळून खोटी प्रतिमा तयार करण्याच्या ‘फडणवीशी’ कारभाराचाही ‘पारदर्शक’ पंचनामा केला जाणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपची एकापाठोपाठ विजयाची मालिका सुरू असताना मनसेला पराभवाचे धक्के पचवावे लागत होते. राज ठाकरे यांच्या करिश्म्याच्या जोरावर पहिल्यापासून मनसेचे वाटचाल सुरू होती. राज यांच्या लाखांच्या सभा होत होत्या. सुरुवातीला मतेही मिळत गेली. या साऱ्यात पक्षबांधणीच्या विषयाकडे म्हणावे तेवढे लक्ष देता आले नव्हते. त्याचाही मोठा फटका लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत बसल्याचे मनसेच्या नेत्यांनी घेतलेल्या आढवा बैठकीत आढळून आले. गेले दोन महिने राज यांच्या आदेशानुसार मनसेच्या नेत्यांनी मुंबईत मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असताना विभाग पुनर्रचनेच्या पाश्र्वभूमीवर प्राधान्याने पक्षबांधणी करणे आवश्यक असल्याचे आढळून आले. राज यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी झालेल्या बैठकीत मनसेच्या नेत्यांनी राज यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली. या बैठकीत कोणतीही खडाजंगी झाली नाही, तर नेत्यांचे म्हणणे ऐकून माझे विचार पोहोचवण्याला तुम्ही कमी पडल्याचे राज यांनी सांगितले.  कार्यकर्ते व लोकांशी नेत्यांचा संवाद असणे आवश्यक असल्याचे राज यांचे म्हणणे होते, असे मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. यापुढे पक्षबांधणी व पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

अनेक प्रश्न प्रलंबित..

भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर आल्यापासून नऊ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तूरडाळीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले तर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देते. राज्यातील सेवायोजन कार्यालयांत ३८ लाख बेरोजगारांची नोंद आहे. नोंद न करणाऱ्यांची संख्या याहूनही अधिक आहे. सर्वाना घरे देण्याच्या रोज थापा मारल्या जात आहेत. मात्र लाखभर गिरणी कामगार आणि पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे तसाच पडून आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वाचार लाख कोटींपर्यंत गेला आहे. या साऱ्याचा पंचनामा करून भाजप हे थापाडय़ांचे सरकार असल्याचे आम्ही दाखवून देऊ, असेही अभ्यंकर यांनी सांगितले.