आठ प्राचीन मंदिर संवर्धनास प्रारंभ

रस्ते विकासाचे काम पाहणाऱ्या एमएसआरडीसीवर राज्य सरकारने प्राचीन मंदिराच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी एमएसआरडीसीवर टाकली आहे.

|| मंगल हनवते

‘एमएसआरडीसी’कडून चार सल्लागार कंपन्यांची नियुक्ती

मुंबई :  महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) चार सल्लागार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. मंदिराच्या संवर्धनासाठी बृहत आराखडा तयार करण्यासह पुढील कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी सल्लागार कंपन्यांवर असणार आहे. त्यानुसार पुढील तीन महिन्यांत बृहत आराखडा पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कामासाठी निविदा काढत २०२२ च्या सुरवातीला प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.

रस्ते विकासाचे काम पाहणाऱ्या एमएसआरडीसीवर राज्य सरकारने प्राचीन मंदिराच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी एमएसआरडीसीवर टाकली आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०१ कोटींची तरतूददेखिल करण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच एमएसआरडीसीने राज्यातील नाशिकमधील गोंदेश्वार मंदिर, कार्लामधील एकविरा मंदिर, औरंगाबादमधील खंडोबा मंदिर, गडचिरोलीमधील शिव मंदिर मार्कंडा, बीड माजलगावमधील भगवान पुरुषोत्तम मंदिर, कोल्हापूरमधील कोपेश्वार मंदिर, अमरावतीमधील आनंदेश्वार शिवमंदिर आणि रत्नागिरी राजापूरमधील धूतपापेश्वार या आठ प्राचीन मंदिराच्या संवर्धनाचा निर्णय घेतला. त्यानुसार मे-जूनमध्ये संवर्धनाच्या कामासाठी बृहत आराखडा तयार करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढली.

या निविदेला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून यातील चार कंपन्यांची अखेर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाकडील कामाचा अनुभव असलेल्या अशा या चार कंपन्या असून प्रत्येकी दोन प्राचीन मंदिराचा बृहत आराखडा एक कंपनी करणार आहे. नाशिकमधील अजिंक्यतारा कन्स्ट्रक्शन, मुंबईतील आभा नारायण लांबा असोसिएट, पुण्यातील किमया आर्किटेक्ट अर्बन डिझायनर्स आणि हरियाणातील द्रोणाह अशा चार कंपन्या असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले. आता तीन महिन्यांत बृहत आराखडा पूर्ण करत कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया पूर्ण करत त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांत अर्थात फेब्रुवारी-मार्च २०२२ पर्यंत कामाला सुरुवात केली जाणार आहे. ही सर्व मंदिरे प्राचिन असून त्यांचे मूळ रूप जपत, पुरातत्व विभागाचे सर्व नियम पाळत संवर्धनाचे काम केले जाणार आहे.  मंदिराच्या दुरुस्ती, मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे या प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहेत.

या मंदिरांचा समावेश

– गोंदेश्वार मंदिर, नाशिक

– एकविरा मंदिर, कार्ला

– खंडोबा मंदिर, औरंगाबाद

– शिव मंदिर मार्कंडा, गडचिरोली

– भगवान पुरुषोत्तम मंदिर, बीड माजलगाव

– कोपेश्वार मंदिर, कोल्हापूर 

– आनंदेश्वार शिवमंदिर,   अमरावती  

– धूतपापेश्वार, रत्नागिरी-राजापूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msrdc appoints four consulting firms akp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी