मुंबई : वर्सोवा-वांद्रे सागरी मार्ग प्रकल्पाचे काम संथगतीने केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कंत्राटदाराला अखेर दंड ठोठावला आहे. १ सप्टेंबरपासून दिवसाला साडेतीन कोटी रुपये असा दंड आकारण्यात येत आहे. १७.१७ किमीच्या, सात हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि आठ मार्गिकांच्या वर्सोवा-वांद्रे सागरी मार्गाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात झाली आहे.या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या प्रकल्पात कास्टिंग यार्डच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न निकाली काढण्यात काही काळ गेला. त्यामुळे एमएसआरडीसीने काही दिवसांची मुदत दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. यानंतर मात्र काही ठरावीक काम ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. पण हे काम या मुदतीत पूर्ण करण्यात कंत्राटदार कंपनी अपयशी ठरली.