मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसीने) वांद्रे रेक्लेमशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नेपीयन्सी रोड येथील आपल्या कार्यालयाच्या जागेचाही विकास करण्याचा विचार सुरू केला आहे. एमएसआरडीसीच्या कार्यालयाची पाच एकर जागा असून या जागेचा विकास करत त्यातून किती महसूल मिळू शकतो याची चाचपणी एमएसआरडीसीने सुरू केली आहे. या जागेच्या विकासातून अंदाजे पाच हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएसआरडीसीने ४००० किमीहून अधिक लांबीचा रस्ते विकास प्रकल्प हाती घेतला आहे. यात शक्तीपीठ, पुणे -नाशिक औद्याोगिक महामार्ग, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता, समृद्धी महामार्गाचा विस्तार यांसह अनेक रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये निधीची गरज आहे. शक्तीपीठ महामार्गासाठीच अंदाजे ८५ हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. हा निधी कसा उपलब्ध करायचा हा प्रश्न एमएसआरडीसी समोर आहे. कर्जरुपाने वा विविध पर्यायाने निधी उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता एमएसआरडीसीने आपल्या मालकीच्या जागांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त भागिदारी प्रकल्प राबवून या जागांवर निवासी-अनिवासी संकुलांची उभारणी करून त्यातून महसूल मिळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने वांद्रे रेक्लमेशन येथील २९ एकर जागेचा विकास करण्याचा निर्णय घेत त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा…अफगाणी नागरिकाला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

अदानी समुहाला वांद्रे रेक्लमेशन येथील २९ एकर जागेच्या विकासाचे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एमएसआरडीचे मुख्यालय असलेल्या सात एकर जागेचा विकास करण्यात येणार आहे. तर त्यानंतर चार वर्षाने कास्टींग यार्डची जागा असलेल्या २२ एकर जागेचा विकास करण्यात येणार आहे. या विकासातून एमएसआरडीसीला कमीत कमी आठ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. तर कार्यालयासाठी ५० हजार चौरस फूट जागा उपलब्ध होणार आहे. आता वांद्रे रेक्लमेशनपाठोपाठ आता एमएसआरडीसीने आपला मोर्चा नेपीयन्सी रोड येथील आपल्या कार्यालयाकडे वळविला आहे. नेपीयन्सी रोड, प्रियदर्शनी पार्क येथे एमएसआरडीसीची पाच एकर जागा आहे. या जागेवर एमएसआरडीसीचे छोटे कार्यालय आहे. हे कार्यालय आणि पर्यायाने पाच एकर जागा पडून आहे. या जागेचा विकास करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

संयुक्त भागीदारीतून विकास

पाच एकर जागेपैकी किती जागेवर आरक्षण आहे, सीआरझेडचा काही अडथळा येईल का, जागेचा विकास कसा करता येईल, किती महसूल मिळू शकेल या सर्व बाबींची तपासणी एमएसआरडीसी करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा…Manohar Joshi Passes Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

दक्षिण मुंबईत मोक्याच्या ठिकाणी ही जागा असून या जागेच्या विकासातून किमान पाच हजार कोटी रुपये महसूल मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार झाल्यानंतर या जागेच्या विकासाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

वांद्रे रेक्लमेशननंतर आता एमएसआरडीसीच्या नेपीयन्सी रोड येथील जागेचा विकासही संयुक्त भागिदारी प्रकल्पाअंतर्गत खासगी विकासकाच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…रत्नागिरीच्या जागेबाबत नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पाच एकर जागेच्या विकासासाठी चाचपणी सुरू आहे. जागेच्या विकासातून पाच हजार कोटी रुपये महसूल प्राप्तीची अपेक्षा ‘एमएसआरडीसी’ने व्यक्त केली आहे.