एमएमआरडीसीचा निर्णय
मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील गँस टँकर अपघातामुळे ३२ तास वाहतूक विस्कळीत झाली आणि यामुळे चौफेर टीका झाल्यानंतर अखेर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या मार्गदर्शक सूचनांच्या धर्तीवर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठीही अशा मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गदर्शक सूचना नेमक्या काय असतील आणि त्यांची अंमलबजावणी नेकमी कशी होईल हे लवकरच स्पष्ट होईल.
राज्यातील सर्वात वर्दळीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग एखाद्या अपघातामुळे पहिल्यांदाच (२००२ नंतर) तब्बल ३२ तास कोंडीत अडकला, वाहतूक विस्कळीत झाली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला आणि मोठी वायू गळती झाली. ज्वलनशील वायू गळती झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तातडीने वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीसीने महामार्ग पूर्णपणे बंद केला. दरम्यान वायू गळती रोखण्यासाठीची कोणतीही यंत्रणा नसल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) बोलावण्यात आले.
मात्र एनडीआरएफलाही वायू गळती रोखणे शक्य झाले नाही. त्यांनी सात ते आठ तास प्रयत्न केले. मात्र एनडीआरएफही अयशस्वी ठरले. शेवटी बुधवारी बीपीसीएल, एचपीसीएल आणि रिलायन्स कंपनीतील तज्ज्ञांना बोलावण्यात आले आणि अखेर वायू गळती रोखण्यात आला, तसेच गॅस टँकर हटवण्यात आला. बुधवारी रात्री पूर्ण महामार्ग सेवेत दाखल झाला, पण अद्यापही महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झालेली नाही.
गुरूवारीही वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यावरून वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीसीवर मोठी टीका होत आहे. आता वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच अशा मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय मजबूत कसा करता येईल याचा विचार या मार्गदर्शक सूचनांमध्ये होणार आहे. तर आपत्तीत वाहतुकीचे कसे व्यवस्थापन करावे यासाठीही उपाययोजनांचा यात समावेश असणार आहे. मात्र अपघात होऊच नये यासाठी वाहतूक व्यवस्थापन अधिक बळकट कसे बनविता येईल याचाही विचार या मार्गदर्शक सूचनांमध्ये केला जाणार आहे. लवकरच या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे काम हाती घेण्यात येईल आणि शक्य तितक्या लवकर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

