मुंबई : महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त ”स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी” घडविण्याचा निर्धार करण्याचे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात सरनाईक यांनी, ”बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीद अंगीकारून एसटीने गेली ७८ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अखंड सेवा पोहोचवली आहे. डोंगर-दऱ्या, दुर्गम आदिवासी भाग, ग्रामीण क्षेत्रे तसेच शहर आणि महानगरांना जोडणारी ‘लालपरी’ ही केवळ वाहतुकीचे साधन नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाची जीवनवाहिनी बनली आहे, असे लिहिले आहे. एसटीच्या या गौरवशाली प्रवासामागे लाखो अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि प्रवाशांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करत सरनाईक यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संकटाच्या काळातही एसटी कर्मचाऱ्यांनी निष्ठेने आणि समर्पणाने सेवा बजावून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी यंदा एसटी परिवाराने ”७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प” केला असून राज्यातील प्रत्येक आगार, बसस्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार असल्याची माहिती देखील सरनाईक यांनी यावेळी दिली. ”एक वृक्ष-एक जीवन” हा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम एसटीमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ”स्वच्छ एसटी – सुंदर एसटी” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून राज्यातील सर्व बसस्थानके, परिसर, बस तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची नियमित स्वच्छता आणि टापटीप राखण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सरनाईक यांनी प्रामुख्याने सांगितले.

महामंडळाच्या आर्थिक शिस्तीसाठी इंधन बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्या बचतीतून मोठी आर्थिक उभारणी शक्य असून इंधन बचतीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणालाही हातभार लागणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा, हरित उपक्रम, स्वच्छता आणि प्रवासी-केंद्रित सेवांच्या माध्यमातून एसटीला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. तसेच, एसटीच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, निवृत्त सेवक आणि राज्यातील सर्व प्रवाशांना शुभेच्छा देताना ”चला, स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि सक्षम एसटी घडविण्याचा निर्धार करूया,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.