मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १ जून २०२६ रोजी विविध योजनांचे लोकार्पण आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला ‘गुलाबी साडी’, ‘लाल लाल बांगडी’फेम लोकप्रिय गायक संजू राठोड सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी लालपरीवर ‘लाल लाल लालपरी’ अशा आशयाचे गाणे ऐकण्याची इच्छा एसटीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे १ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून हा कार्यक्रम रंगणार असून संजू राठोड यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

एसटी महामंडळाचे सदिच्छा राजदूत रितेश आणि जेनेलिया देशमुख हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी, महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात एसटी आगार परिसरात ७८ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. ७८ हजार झाडे लावून, पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे. तसेच १ जूनपासून स्वच्छता मोहिमेलाही सुरुवात करण्यात येणार आहे.

बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. १ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असून, प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या वर्धापन दिन सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती आणि विविध विकास योजनांच्या घोषणांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून, १९४८ रोजी एसटीची पहिली बस धावली. त्यानिमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या ७८ वर्षात राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व किफायतशीर प्रवाशी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आहे. आता देखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडीअडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे.