मुंबई : उशिरा सुचलेल्या शहाणपणातून एसटी महामंडळाने १ मेपासून राज्यभर “आपली बस, आपली सेवा” अभियान सुरू केले आहे. या अभियानाला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी आणि एसटी कर्मचारी या दोन्ही घटकांनी या उपक्रमाला मनापासून स्वीकारत सेवेच्या नव्या पर्वाची सकारात्मक सुरुवात केली आहे. या अभियानामुळे एसटी महामंडळाची प्रवाशांमधील प्रतिमा सुधारण्यास मदत होत असून हा बदल योजनेपुरता न होता भविष्यात देखील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांबरोबर सौजन्याने वागावे,असा सूर प्रवासी वर्गातून उमटत आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रवाशांबरोबर विश्वासाचे नाते दृढ करणे हा आहे. या दिशेने पहिल्याच दिवसापासून विविध आगारांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले आहेत. राज्यभरातील अनेक बसस्थानकांवर स्वच्छता, शिस्त आणि वेळेचे काटेकोर पालन यावर विशेष भर दिला जात आहे. चालक आणि वाहक हे केवळ आपली जबाबदारी पार पाडत नसून, प्रवाशांबरोबर संवाद साधत त्यांना आवश्यक ती माहिती देताना दिसत आहेत. बस सुटण्यापूर्वी चालकांनी स्वतःची ओळख करून देणे, मार्ग आणि थांब्यांची माहिती सांगणे, या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टींमुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
प्रवाशांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वच्छता राखणे, नियमांचे पालन करणे आणि सहप्रवाशांबद्दल संवेदनशीलता दाखवणे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षणाचा वापर वाढताना दिसत असून, प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या वर्तनाचे कौतुक केले. “आता प्रवास अधिक सुखद आणि सन्मानपूर्वक वाटतो,” अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तर कर्मचाऱ्यांनाही ‘सेवक’ म्हणून काम करण्याची नवी प्रेरणा मिळाल्याचे दिसून येते.
अडचणीच्या प्रसंगी तत्काळ पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे आणि बसस्थानकांची स्वच्छता राखणे या बाबतीतही सुधारणा जाणवत आहे. यामुळे एसटीबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन पुन्हा निर्माण होण्यास मदत होत आहे.
एकूणच, “आपली बस, आपली सेवा” हे अभियान केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून एसटीचा प्रवास आता अधिक विश्वासार्ह, संवेदनशील आणि समाधानकारक बनत असून, लालपरीच्या चाकांना नव्या विश्वासाची गती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
