मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक, बसगाड्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

गेली अनेक वर्षे एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने भक्तांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेने ते कर्तव्य बजावत आहेत. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरवर्षीच अशा प्रकारचा उपक्रम राबवणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. आषाढी वारीच्या काळात ५, ६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बस स्थानक, भिमा बस स्थानक, विठ्ठल बस स्थानक व पांडुरंग बस स्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे.