मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ योजनेतील चार आणि सात दिवसांचे पास आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. एसटीच्या संकेतस्थळासह मोबाइल ॲपवरून घरबसल्या पास काढता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने २९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या दोन्ही कालावधीच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास उपलब्ध होईल. प्रवाशाला मिळालेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाइलमधील पीडीएफ स्वरूपात दाखवता येणार आहे.

क्यूआर कोडद्वारे पडताळणी

ऑनलाइन पासवर क्यूआर कोड देण्यात येणार असून प्रवासाच्या वेळी वाहकाच्या ईटीआयएम मशीनद्वारे त्याची तपासणी केली जाईल. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, वैधता कालावधी यासह आवश्यक माहिती ईटीआयएम मशीनवर प्रदर्शित होईल. त्यानंतर प्रवाशाने दाखविलेल्या ओळखपत्राचीही पडताळणी केली जाणार आहे. पास आणि ओळखपत्राची माहिती जुळल्यानंतरच प्रवासाची परवानगी दिली जाईल.

सुट्टीच्या काळात दिलासा

ऑनलाइन पास सुविधेमुळे आगारांमधील गर्दी आणि पास काढण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः सुट्टीचा काळ, पर्यटनाचा हंगाम तसेच सणांच्या कालावधीत प्रवाशांना या सुविधेचा लाभ होणार आहे. ऑनलाइन पासची माहिती विभागीय कार्यालये, आगार आणि स्थानिक पातळीवर प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.