मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) कार्डधारकांना आता ‘भीम ॲप’च्या माध्यमातून आपल्या कार्डचे ‘टॉपअप’ करता येईल. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक; तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान व प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने नुकताच ‘भीम ॲप’द्वारे एनसीएमसी कार्ड ‘टॉपअप’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या पाठीमागील क्यूआर कोड ‘भीम ॲप’च्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार ‘टॉपअप’ करता येईल. त्यामुळे प्रवाशांना एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास’ या उद्देशाला या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

प्रवाशांना आवाहन एसटी महामंडळाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) १ सप्टेंबरपासून अनिवार्य केले होते. परंतु, एनसीएमसी कार्ड असून देखील प्रवाशांना कार्ड रिचार्ज करणे, कार्ड कार्यान्वयन, त्यातील रक्कम टॉपअप, उपलब्ध शिल्लक रक्कम तपासणे; तसेच कार्डच्या वापराबाबत इतर समस्या येत असल्याचे निदर्शनास आल्या.

या तांत्रिक अडचणी, अनेकांची रखडलेली नोंदणी यामुळे एनसीएमसी अनिवार्य करण्याच्या निर्णयास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ज्यांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी कार्डद्वारेच सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.