मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने कायमस्वरूपी १३.५६ टक्के प्रवासी भाडेवाढ लागू केल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः गट आरक्षणाद्वारे प्रवास करणाऱ्या भाविकांना आता वाढीव भाड्यामुळे अधिक आर्थिक भार सोसावा लागणार आहे.एसटी महामंडळ ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून दररोज लाखो प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह प्रवासी सेवा उपलब्ध करून देत आहे. मात्र, गेल्या काही कालावधीत डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळाच्या दैनंदिन इंधन खर्चात मोठी वाढ झाली. एसटी महामंडळाला एप्रिल, मे, जून महिन्यात खूप तोटा झाला. जून महिन्यात ९१.१८ कोटी रुपये झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात जवळपास ६० टक्क्यांची वाढ झाली.

तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून भाडेवाढीचा निर्णय घेतला. हंगामी भाडेवाढीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना १० टक्के जादा भाडे द्यावे लागत होते. तर, नुकताच हंगामी भाडेवाढ रद्द १३.५६ टक्के भाडेवाढ कायमस्वरूपी करण्यात आली आहे.

खासगी वाहतूकदार मुंबई ते गोवा मार्गावर मोठ्या संख्येने बस चालवून नफा कमावत असताना एसटीकडून मुंबई ते पणजी किंवा सिंधुदुर्गसाठी अत्यल्प बस सेवा दिली जाते. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत असल्याची व्यथा कोकणवासीय प्रवासी संघाच्यावतीने मांडली. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतून लाखो गणेशभक्त कोकणात जातात. रेल्वेतील प्रतीक्षा यादी आणि गर्दीमुळे अनेक जण एसटीच्या गट आरक्षणाचा पर्याय निवडतात. मात्र, यावर्षी वाढीव भाड्यामुळे गट आरक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असून अनेक मंडळे, कुटुंबे आणि संस्थांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. सणासुदीच्या काळात भाडेवाढ करण्याची पद्धत चुकीची आहे. आषाढी वारी, गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि उन्हाळी सुट्टी अशा गर्दीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचे मत कोकणवासीय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले. भाडेवाढीमुळे एसटीला प्रत्यक्षात किती आर्थिक फायदा झाला, याचा लेखाजोखा महामंडळाने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

एसटी महामंडळाने वाढीव इंधन आणि संचालन खर्चामुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले असले, तरी गणेशोत्सवाच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशभक्त आणि नियमित प्रवाशांमध्ये नाराजी वाढली असून सणासुदीच्या काळात भाडेवाढ मागे घेण्याची किंवा विशेष सवलत देण्याची मागणी जोर धरत आहे.