आर्थिक नुकसानीच्या गर्तेत अडकलेल्या एसटी महामंडळाला नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीचा फटका बसला असून या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी एसटी महामंडळ पुन्हा भाडेवाढीचा मार्ग पत्करण्याची शक्यता आहे. मात्र ही भाडेवाढ आपोआप भाडेवाढ सूत्रानुसारच होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. एसटीच्या भाडय़ात १.८९ टक्के भाडेवाढ होणार असून तसा प्रस्ताव लवकरच चर्चेला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या म्हणण्यानुसार असा कोणताही प्रस्ताव महामंडळासमोर नाही.
केंद्र सरकारने गेल्या आठवडय़ात पेट्रोलचे दर स्वस्त करत डिझेलचे दर मात्र लिटरमागे ६३ पैशांनी वाढवले. एसटीला दर दिवशी १३ लाख लीटर डिझेल लागते. त्यामुळे या दरवाढीमुळे एसटीला दरमहा २.१५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा तोटा वर्षांला २६ कोटी रुपये एवढा प्रचंड आहे. हा तोटा कमी करण्यासाठी डिझेल दरवाढ झाल्यानंतर आपोआप भाडेवाढीच्या सूत्रानुसार एसटीच्या तिकीट भाडय़ात वाढ होते. त्यानुसार आताच्या ६३ पैसे डिझेल दरवाढीनंतर एसटीच्या तिकीट भाडय़ात १.८९ टक्के वाढ होणार आहे, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले. या भाडेवाढीमुळे एसटीच्या उत्पन्नात ३५ लाख रुपये दरमहा वाढ होणार आहे. तसेच या भाडेवाढीचा परिणाम तिकिटांवर किती आणि कसा होईल, हे मात्र नंतरच स्पष्ट होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मात्र याबाबत एसटीचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्याशी संपर्क साधला असता डिझेल दरवाढीचा फटका एसटीला बसणार असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव महामंडळासमोर चर्चेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.