मुंबई : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला मागील काही महिन्यात ऐतिहासिक तोटा सहन करावा लागला. तोट्याच्या खाईत अडकलेल्या एसटी महामंडळाचा तोटा, आता प्रवाशांच्या खिशातून भरून काढला जाणार आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ केली आहे. ही भाडेवाढ १८ जुलैपासून लागू झाली. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता एसटीच्या भाडेवाढीचेही चटके सोसावे लागणार आहेत. तसेच येत्या गणेशोत्सवात गावी जाणाऱ्यांना एसटीच्या भाडेवाढीसाठी अधिक पदरमोड करावी लागणार आहे.

एसटी महामंडळाला एप्रिल, मे, जून महिन्यात मोठा तोटा झाला. जून महिन्यात ९१.१८ कोटी रुपये झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तोट्यात जवळपास ६० टक्क्यांची वाढ झाली. अनेक नवनवीन प्रयोग करून देखील एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे. त्यामुळे राज्य परिवहन प्राधिकरणाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ;  तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला. या भाडेवाढीच्यामुळे यापूर्वी केलेली साध्या बसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

गणेशोत्सव कालावधीत मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून  कोकणातील मूळगावी जाण्यासाठी प्रवासी एसटीला पसंती देतात. तसेच अनेकजण गट आरक्षण करून एसटी आरक्षित करतात. परंतु, आता भाडेवाढ झाल्याने प्रवाशांचा प्रवास महागला आहे. तसेच नियमित प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.

बसचा मार्ग                  जुने दर              नवीन दर

मुंबई – सातारा                ४९८ रु.             ५१५ रु.
मुंबई – कोल्हापूर             ७३० रु.             ७५५ रु.
मुंबई – नाशिक                ३५५ रु.             ३७० रु.
मुंबई – धुळे                     ६६४ रु.             ६८५ रु.
मुंबई – चिपळूण               ४९८ रु.             ५१५ रु.
मुंबई – सोलापूर                ७७५ रु.             ८०० रु.
पुणे – कोल्हापूर                ४२१ रु.             ४३५ रु.
पुणे – अहिल्यानगर           २३३ रु.             २४० रु.
पुणे – संभाजीनगर            ४५४ रु.             ४७० रु.
पुणे – सोलापूर                 ४६५ रु.             ४८० रु.

नाशिक – पुणे                  ४१० रु.             ४२५ रु.

नवीन दरपत्रकानुसार, मुंबई – सोलापूर प्रवासासाठी आता थेट ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच पुणे – संभाजीनगर मार्गावर ४७० रुपये आणि मुंबई – नाशिक मार्गावर ३७० रुपये भाडे आकारले जाईल. अचानक झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महामंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.