मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी ‘विना वाहक’ बससेवेला प्राधान्य देऊन खर्चात बचत आणि उत्पन्नवाढ या दोन्ही उद्दिष्टांवर एकाच वेळी भर देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड आणि स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ही सेवा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.
एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केवळ तिकीट दरवाढ हा पर्याय असू शकत नाही. प्रवाशांना अधिक चांगली सेवा देतानाच उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे, अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि उपलब्ध मनुष्यबळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. त्यांनी ‘विना वाहक’ बससेवेचा उल्लेख करत काही मार्गांवर वाहकावरील खर्च कमी करण्याची शक्यता व्यक्त केली. यासाठी डिजिटल तिकीट प्रणाली, क्यूआर कोड, स्मार्ट कार्ड आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले.
प्रवासी केंद्रस्थानी ठेवण्यावर भर
आर्थिक तोटा कमी करण्याबरोबरच प्रवाशांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ होणे गरजेचे असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. प्रवाशांच्या गरजा, बदलती प्रवासाची पद्धत आणि स्थानिक मागणी लक्षात घेऊन प्रवासीभिमुख योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रवाशांना वेळेत, सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा मिळणे ही एसटीची प्राथमिक जबाबदारी आहे. ”प्रवासी समाधानी तर एसटीची आर्थिक गाडी रुळावर” या दृष्टिकोनातून भविष्यातील योजनांची आखणी करावी, ” असे ते म्हणाले. एसटी ही केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आर्थिक बळकटीकरण करताना प्रवाशांच्या हिताशी कोणतीही तडजोड न करता आधुनिक, कार्यक्षम आणि किफायतशीर सेवा देण्यावर भर राहील, असेही सरनाईक स्पष्ट केले.
