मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन वर्षापूर्वी हिरकणी बसच्या ४४४ बस फेऱ्या धावत होत्या. तर, आता या फेऱ्यांची संख्या ९७ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे ७८ टक्के फेऱ्यांची घट झाली आहे. हिरकणीसह शिवशाही, शिवनेरी बसच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.
एसटी महामंडळाद्वारे चालविण्यात येणाऱ्या दादर-पुणे हिरकणी बससेवेच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती समोर आली आहे. दादर स्थानकातून पुण्याकडे धावणाऱ्या या बससेवेवर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी अवलंबून असतात. परंतु, बसगाड्यांची कमतरता, चालक-वाहकांची अपुरी उपलब्धता, देखभाल आणि तांत्रिक अडचणी, कमी प्रवासी प्रतिसाद असलेले वेळापत्रक या कारणांमुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.
सकाळी व सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बस कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहन किंवा रेल्वेचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. विशेषतः पुण्यातील स्वारगेट बस थांबा येथे पोहोचणाऱ्या फेऱ्या कमी झाल्याने कामगार व विद्यार्थी वर्गाची गैरसोय होत आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये दादर – पुणे दरम्यान हिरकणी बसच्या ४४४ बस फेऱ्या धावत होत्या. तर, फेब्रुवारी २०२५ मध्ये २०५ आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये ९७ बस फेऱ्या धावत आहेत. दोन वर्षात ७८ टक्के बस फेऱ्या कमी झाल्या. तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये दादर – पुणे दरम्यान शिवशाही बसच्या १०४ बस फेऱ्या धावत होत्या. तर, फेब्रुवारी २०२६ मध्ये २१ बस फेऱ्या धावत आहेत. एका वर्षात ७९.८ टक्के बस फेऱ्या कमी झाल्या.
महिला सन्मान योजना सुरू झाल्यापासून हिरकणी बसचे महिला प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलित शिवनेरी, विद्युत शिवनेरीकडे वळले आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्याने हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कपात केली, असल्याची माहिती एसटी महामंडळाद्वारे देण्यात आली.
दादर – पुणे शिवनेरी बस फेऱ्या कमी
शिवनेरी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. परंतु, मंगळवार ते गुरुवारी प्रवाशांची संख्या कमी असल्याने, या तीन दिवशी शिवनेरी बसच्या दादर – पुणे आणि पुणे – दादर अशा प्रत्येकी दोन आणि एकूण ४ फेऱ्या कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
