मुंबई : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीने एसटी महामंडळाला प्रतिपूर्ती रक्कम मिळत होती. या रकमेतून एसटी महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला जात होता. परंतु, नुकताच अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांच्या खात्यातील कामे प्रलंबित होती.
परिणामी, एसटी महामंडळाला प्रतिपूर्ती रक्कम वेळेत मिळेल की नाही, वेतन ७ तारखेला होईल की नाही, असे प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार असून एसटी महामंडळाला डिसेंबर महिन्याची प्रतिपूर्ती रक्कम फडणवीस यांच्या स्वाक्षरीने मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे २८ जानेवारी रोजी सकाळी निघाले होते. बारामती विमानतळावर विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदासह क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. परंतु, अर्थ खात्याची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हातात घेतली.
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळण्यासाठी, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर एसटी महामंडळाला डिसेंबर २०२५ चे सवलत मूल्य व फरकाचा हप्ता राज्य शासनाने उपलब्ध केला. त्यानुसार, राज्य शासनाद्वारे ४०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.
डिसेंबर महिन्याचे सवलतमूल्य व फरकाचा हप्ता उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री सरनाईक यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी राज्य शासनास विनंती केली होती. ज्यामुळे महामंडळास कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर देणी व खर्च देण्यास अडथळे येत होते. त्याअनुषंगाने एसटी महामंडळास डिसेंबरचे सवलतमूल्य व प्रतिपूर्ती उपलब्ध करुन निधी वितरित करण्यात आला. २०२५-२६ या आर्थिक वर्षामधील लेखाशिर्षामधून ४०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून हे अर्थसहाय्य बिनशर्त आहे.
एसटी महामंडळात प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. यात महिलांसाठी सर्व बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास, अंध आणि अपंग व्यक्तींना साध्या आणि निमआराम बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत आहे तसेच शिवशाही बस सेवांमध्ये ४५ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांना साध्या बस सेवांमध्ये ६६.६७ टक्के सवलत, स्वतंत्रसैनिकांना मोफत प्रवास, माजी आणि विद्यमान विधिमंडळ सदस्यांना मोफत प्रवास, तसेच सामान्य प्रवाशांना इतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी १५ टक्के सवलत आगाऊ आरक्षणावर देण्यात येते.
एसटी महामंडळातर्फे जवळपास ३० प्रकारच्या वेगवेगळ्या योजना प्रवाशांना दिल्या जातात. ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती व फरकाची रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येते.

