मुंबई : राज्य शासनाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला जानेवारी २०२६ चे सवलतमूल्य उपलब्ध केले आहे. राज्य शासनाने शुक्रवारी ५०० कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्यास मान्यता दिली.

एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर देणी देण्यासाठी राज्य शासनावर अवलंबून राहावे लागते. जानेवारी महिन्याचे सवलतमूल्य उपलब्ध करण्याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी राज्य शासनाला विनंती केली होती. त्याअनुषंगाने एसटी महामंडळाला जानेवारीचे सवलतमूल्याचा प्रतिपूर्तीपोटी निधी वितरित करण्यात आला. या निधीद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे.

राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या राज्यातील हजारो प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. या सवलतीच्या योजना एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना दिल्या जातात. या सवलतींचे उत्तरदायित्व राज्य सरकारचे आहे. महिला प्रवाशांना सर्व बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, अंध आणि अपंग व्यक्तींना साध्या आणि निमआराम बस सेवांमध्ये ५० टक्के सवलत, शालेय विद्यार्थी, स्वतंत्रसैनिकांना, माजी आणि विद्यमान विधिमंडळ सदस्य आदींना सवलती दिल्या जातात. या सवलतींच्या मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी व फरकाची रक्कम राज्य सरकारकडून देण्यात येते.