लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीद वाक्यानुसार महानगर आणि खेडेगावांना ‘लालपरी’ची सेवा जोडलेली आहे. होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अचूक अंदाज घेऊन एसटी महामंडळाने ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.
‘लालपरी’ २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत कोकणाच्या दिशेने अधिक वेगाने धावणार असून, होळीनिमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागांतून करण्यात आले आहे. ठाणे विभागातून तब्बल ७९ फेऱ्या नियोजित असून, त्यापैकी ७१ फेऱ्या आगाऊ आरक्षणामुळे आधीच पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्या आहेत. मुंबई विभागातून ६२ फेऱ्या नियोजित असून, ३७ फेऱ्यांचे आरक्षण झाले आहे. तर २५ फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालघर विभागातून २४ फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत. रायगड विभागातून ३३ फेऱ्या होणार असून, त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.
२८ फेब्रुवारी आणि १ मार्चला ‘लालपरी’ची सर्वाधिक धाव
या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दोन दिवशी अपेक्षित आहे. २८ फेब्रुवारी रोजी तब्बल ९१ फेऱ्या, तर १ मार्च रोजी ५९ फेऱ्या नियोजित केल्या आहेत. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एसटी प्रशासनाने या दिवसांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
गट आरक्षणाला प्राधान्य
एकूण १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या गट आरक्षणासाठी राखीव आहेत. यामुळे कुटुंब, मित्र मंडळी किंवा संस्थात्मक प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही पर्याय उपलब्ध झाला आहे.
‘लालपरी’ ठरणार प्रवाशांची विश्वासू सोबती
एसटी महामंडळाच्या या नियोजनामुळे होळीच्या सणात होणारी संभाव्य गैरसोय टळणार असून, प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याचबरोबर खासगी वाहतुकदारांकडून होणाऱ्या मनमानी भाडेवाढीलाही आळा बसेल. होळीनिमित्त नातेवाईकांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रवाशांकरीता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे, अशी भावना एसटी महामंडळाने व्यक्त केली.

