मुंबई: सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीचा फटका हा एसटीच्या मालवाहतुकीलाही बसला आहे. एसटीत मालवाहतूक करणाऱ्या गाडय़ा या डिझेलवरील आहेत. त्यात वाढ होत असल्याने एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर १ मेपासून लागू होणार आहेत. सध्या मालवाहतुकीचा दर हा कमीत कमी एकेरी वाहतुकीसाठी १०० किलोमीटपर्यंत प्रति किलोमीटर ४८ रुपये दर आहे. तर ४ हजार रुपये एकेरी वाहतुकीसाठी भाडे आहे. १०१ किलोमीटर ते २५० किलोमीटपर्यंत ४६ रुपये प्रति किलोमीटर, तसेच २५१ किलोमीटरच्या पुढे ४४ रुपये प्रति किलोमीटर दर आहे. या दरांमध्ये १ मेपासून  वाढ होणार असून कमीतकमी ४ हजार ५०० रुपये एकेरी वाहतुकीसाठी भाडे असेल. तर २०० किलोमीटपर्यंत ५७ रुपये प्रति किलोमीटर आणि २०१ किलोमीटरच्या पुढे ५५ रुपये प्रति किलोमीटर दर असेल.   सध्या एसटी महामंडळाकडे १ हजार १२७ मालवाहू ट्रक आहेत. सुरुवातीला मे २०२० ते मे २०२१ पर्यंत ९५ हजार फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेर्टिक टन मालाची वाहतूक करण्यात आली होती आणि तब्बल १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार केला होता.