मुंबई : राज्य परिवहन (एसटी) प्रवासातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी १ सप्टेंबरपासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केल्यानंतर राज्यभरात मोठा गोंधळ उडाला आहे. अनेक ठिकाणी कार्ड नसल्याने महिलांसह ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट घ्यावे लागल्याच्या तक्रारी समोर आल्या. सर्व्हरवरील ताण, रिचार्ज सुविधेचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी व वाहकांमध्ये वाद वाढत आहेत.

एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे तिकीट आता एनसीएमसी कार्डद्वारे दिले जात आहे. आतापर्यंत १.११ कोटी प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली. परंतु, ज्या प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी न करणाऱ्या प्रवाशांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने तातडीने परिपत्रक काढून सहा महत्त्वाच्या बाबींमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद यांच्या स्वाक्षरीने सर्व विभागीय नियंत्रकांना तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

एसटीकडून ६ दिलासे

– आधीच ऑनलाइन आरक्षण केलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डशिवायही आरक्षित तिकिटावर सवलतीचा प्रवास करता येईल.

– कार्डसाठी नोंदणी केली पण कार्ड मिळाले नसल्यास नोंदणीची पावती दाखवून ३० सप्टेंबरपर्यंत सवलतीच्या तिकिटावर प्रवास करता येईल.

– ”एसटी संगे तीर्थाटन” योजनेतील प्रवाशांना १२ सप्टेंबरपर्यंत जुनी सवलत पद्धत लागू राहील.

– गणेशोत्सवासाठीच्या गट आरक्षणामध्ये एनसीएमसी कार्ड सक्तीचे राहणार नाही.

– सर्व्हरवरील ताणामुळे १४ सप्टेंबरपर्यंत कागदी सवलतीची तिकिटे वैध राहतील.

– ज्यांच्याकडे सक्रिय एनसीएमसी कार्ड आहे, त्यांनाच कार्डद्वारे सवलतीचे तिकीट दिले जाईल.

कामोठे ते आंबेगाव फाटा दरम्यान प्रवास करताना, सवलतीच्या तिकीटाऐवजी एकूण ४८० रुपयांचे पूर्ण तिकीट आकारण्यात आले. एनसीएमसी कार्ड काढण्यास अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच कार्ड देणे आवश्यक आहे. – वंदना सोनवणे, प्रवासी

सर्व्हर डाऊन, रिचार्ज वरून संभ्रम

कार्ड सक्तीच्या पहिल्याच दिवसापासून अनेक आगारांमध्ये नेटवर्क आणि सर्व्हरच्या अडचणी निर्माण झाल्या. काही ठिकाणी एसटीने रिचार्ज अधिकृत एजंटकडे होईल असे सांगितले. तर, एजंटांनी रिचार्जची सुविधा वाहकांकडे असल्याचे सांगितल्याने संभ्रम वाढला. मात्र, वाहकांकडे रिचार्जची सुविधा नसल्याने तिकिट खिडक्यांवर रांगा लागल्या आणि प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये वाद वाढले.

ग्रामीण भागातील अडचणी

एसटी आगारापासून सुमारे ३० ते ३५ किमी दूर राहणाऱ्या नागरिकांना केवळ कार्ड रिचार्ज करण्यासाठी एसटी आगारात यावे लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रिचार्जची सुविधा वाहकांकडे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून द्यावी आणि तोपर्यंत आधार कार्ड पर्याय म्हणून सुरू ठेवावा. – दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ

रोहित पवार यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. सवलतीसाठी १९९ रुपयांचे कार्ड घेणे, किमान १०० रुपयांचा शिल्लक ठेवणे आणि वारंवार रिचार्ज करणे ही ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अनावश्यक डोकेदुखी आहे. सवलत देताना डिजिटल अडथळे निर्माण करण्याऐवजी प्रवाशांच्या सोयीचा विचार करावा, असे मत त्यांनी ”एक्स” (ट्विटर) वर व्यक्त केले. ———————