मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासाला आता डिजिटल स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी (एनसीएमसी- स्मार्ट कार्ड) राज्यभरात एक कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे कार्यान्वित झाली आहेत. दरम्यान, सवलतीच्या प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्डचा वापर येत्या १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एनसीएमसी’ कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू केली. २६ जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व पात्र प्रवाशांची कार्ड त्यांनी नोंदणी केलेल्या ठिकाणी वितरणासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे कार्ड मिळालेल्या प्रवाशांनी ते कार्यान्वित करून त्यामध्ये टॉप-अप करावे आणि त्यानंतर एसटी बस प्रवासात कार्डचा वापर करावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
१५ ऑगस्टपासून राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठीही ‘एनसीएमसी’ कार्डची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी विद्यार्थ्यांची नोंदणी करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘एनसीएमसी’ कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे एसटीने स्पष्ट केले आहे. ‘एनसीएमसी’ कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंटकडे उपलब्ध करण्यात आले आहे. कार्ड रिचार्जची सुविधाही याच माध्यमातून उपलब्ध आहे.
सवलतीच्या प्रवासासाठी १ सप्टेंबरपासून कार्ड अनिवार्य
कार्डशिवाय सवलतीचा प्रवास नाही ‘एनसीएमसी’कार्डच्या माध्यमातून एसटीतील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना कार्ड देण्यात येत आहे. १ सप्टेंबरपासून या सवलतधारकांना एसटीचा सवलतीचा प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्डचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या पात्र प्रवाशांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. नोंदणीसाठी होणारी गर्दी आणि वेळेची बचत करण्यासाठी एसटीच्या वेब पोर्टलवरून पूर्वनियुक्ती घेण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
टॉप-अपची सुविधा
‘एनसीएमसी’ कार्डमध्ये रिचार्ज करण्यासाठी एसटीच्या वाहकांच्या ‘ईटीआयएम’ मशीनद्वारे सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय एसटी महामंडळाचे संकेतस्थळ, मोबाईल ॲप्लिकेशन आणि अधिकृत एजंट यांच्या माध्यमातूनही कार्ड रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे सवलतधारक प्रवाशांनी कार्ड नियमितपणे वापरून एसटीच्या डिजिटल प्रवास व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
