मुंबई : एसटी महामंडळाच्या परळ बस स्थानकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाहणीदरम्यान उघडकीस आलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेऊन राज्य सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. परिवहन विभागाच्या अधिकृत पत्राद्वारे एसटी महामंडळाला महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार उपमुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी ॲड. सोमनाथ तिकोटकर यांची समिती स्थापन करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या मुंबई विभागातील परळ बसस्थानकाची प्रताप सरनाईक यांनी २४ जानेवारी रोजी पाहणी केली. यावेळी परळ बस स्थानकात अस्वच्छता असल्याचे आढळले होते. तसेच कामात नियोजनाचा अभाव, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे जाणवले. तसेच परळ आगारातील चालक व वाहकांच्या विश्रांतीगृहात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या होत्या. याशिवाय काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची नोंदही सरनाईक यांच्या निदर्शनास आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत त्यांनी सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार महाव्यवस्थापक/ उपमहाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली असून ही समिती या प्रकरणाची तपशीलवार चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगात्मक कारवाईची शिफारस करणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी राज्यस्तरावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबतही समितीने ठोस सूचना सादर कराव्यात, असे आदेश पत्रात देण्यात आले आहेत.

चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईबाबत शासनाला तात्काळ कळविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे परिवहन विभागातील शिस्त व जबाबदारी अधिक कडक होण्याचे संकेत मिळत असून, कर्मचाऱ्यांमध्येही प्रशासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट संदेश गेला आहे. सरकारच्या या पावलामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अधिक बळकट होईल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

कर्तव्यावर असताना एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन करू नये, अशा सूचना वारंवार देण्यात येत आहेत. कर्तव्यावर असताना कर्मचाऱ्याने मद्यपान केल्याचे आढळताच त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले आहेत. मात्र, तरीही कर्मचारी मद्यप्राशन करून कर्तव्यावर जात असल्याचे निर्देशनास आले. परळ आगारातील विश्रांतीगृहात मद्यप्राशन केलेला चालक आढळून आला. यावेळी त्याची तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. या प्रकरणी एसटीच्या सातारा आगारात कार्यरत असलेल्या चालकाला निलंबित करण्यात आले.