मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मोफत प्रवास पास सुविधेसाठी जुलै २०२६ पासून राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार, एप्रिल २०२६ पासून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मंजूर करण्यात आला आहे. या पासधारकांना साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार असून, इतर श्रेणीतील बसमध्ये प्रवास करताना भाड्यातील फरक भरून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

जुलै २०२६ पासून मोफत प्रवास पासाचा लाभ घेण्यासाठी सशुल्क ‘रुपे ऑन द गो’ सक्षम एनसीएमसी कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड ईबिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेडमार्फत वितरित करण्यात येणार असून, एसटीच्या २५१ आगारांमध्ये, ३३५ वाहतूक नियंत्रण कक्षांमध्ये तसेच एनएसडीएल पेमेंट बँकेच्या अधिकृत एजंटमार्फत कार्ड नोंदणी व वितरण होणार आहे.

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्ड मिळविण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. पती-पत्नी संयुक्त मोफत पाससाठी स्वतंत्र माहिती द्यावी लागणार असून, मृत कर्मचाऱ्यांच्या विधवा किंवा विधुरांना देखील स्वतंत्र अर्ज प्रक्रियेद्वारे सुविधा मिळणार आहे.

महामंडळाच्या सूचनांनुसार, एनसीएमसी कार्डची वैधता अर्ज ३१ मार्च २०२७ पर्यंत राहणार आहे. त्यानंतर दरवर्षी कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कार्ड तयार होण्यासाठी साधारण ३० दिवसांचा कालावधी लागणार असून, तोपर्यंत विद्यमान कागदी मोफत पास वैध राहणार आहे. तसेच, कार्ड तयार झाल्यानंतर जुना कागदी पास प्रशासनाकडे जमा करणे पासधारकांसाठी बंधनकारक आहे. त्यानंतरच एनसीएमसी कार्ड सक्रिय करून संबंधित लाभार्थ्याला देण्यात येणार आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या अमृतज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा कायम राहील. मात्र, बस श्रेणीतील भाडे फरक, स्वच्छता अधिभार आणि अपघात सहाय्यता निधीची रक्कम एन.सी.एम.सी. कार्डमधून वसूल केली जाईल. दरम्यान, एनसीएमसी कार्ड गहाळ किंवा खराब झाल्यास अधिकृत केंद्रामार्फत कार्ड बंद करून नव्याने कार्ड घ्यावे लागणार आहे. याबाबतची माहिती सर्व आगार, विभाग आणि घटकांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत.

एनसीएमसी कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३ हजारांहून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवर ही कार्ड उपलब्ध करण्यात येत आहेत. नवीन एनसीएमसी कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.

मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.