मुंबई : प्रवासादरम्यान महिला प्रवाशांची गैरसोय होऊ  नये, यासाठी एसटी बस स्थानकातील महिला प्रसाधनगृहात ‘सॅनिटरी नॅपकिन मशीन’ बसवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, एक वर्ष उलटले तरी एकाही स्थानकात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ही योजना कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

नोव्हेंबर २०१८ मध्ये विद्यमान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते मुंबई सेन्ट्रल बस स्थानकात ‘सॅनिटरी नॅपकिन मशीन’ योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. प्रत्येकी १० रुपयांची दोन नाणी मशीनमध्ये टाकल्यानंतर त्यातून महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळेल, अशी योजना होती. एसटीच्या मदतीने एका खासगी संस्थेमार्फत १४ बस स्थानकांतील महिला प्रसाधनगृहात या मशीन बसवण्यात येणार होत्या. मुंबई सेन्ट्रल स्थानकातील महिला प्रसाधनृहात एक मशीन बसवण्यात आली होती. मात्र ती मशीनही काढून टाकण्यात आली. तर अन्य कोणत्याही स्थानकात या मशीन बसवण्यात आलेल्या नाहीत.

राज्यात एसटीच्या ४ हजार ५०० महिला वाहक कार्यरत आहेत. तसेच महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय असते. अशा वेळी महिलांच्या सोयीसाठी ही योजना आवश्यक होती. मात्र, एसटीच्या संबंधित विभागाकडून संस्थेला बस स्थानकांची यादी सादर करण्यात आली नाही. त्यामुळे ही योजना रखडली आहे.

महिला विश्रांतिगृहाची दुरवस्था

एसटीच्या सेवेत ४,५०० महिला वाहक आहेत. मात्र या वाहकांसाठी बस स्थानक व आगारात असलेल्या विश्रांतिगृहाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे एसटी महामंडळाने दुलक्र्षच केले आहे. त्यामध्ये असणाऱ्या प्रसाधनगृहांची स्वच्छता नाही. तसेच विश्रांतिगृहाला साधी रंगरंगोटीही नाही. तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छता असेच चित्र विश्रांतिगृहात दिसते.