Mumbai Transport / मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या मेट्रोचा स्मार्ट कार्ड मोफत दिला जातो. मुंबईकरांची आवडती वाहतूक सेवा बेस्टचा स्मार्ट कार्ड १०० रुपयात मिळतो मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलत धारक प्रवाशांसाठी सुरु केलेल्या स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना चक्क १९९रुपये मोजावे लागणार आहे.

एसटी मधून प्रवास करणारा हा राज्यातील गरीब, गरजू, मध्यमवर्गीय प्रवासी असून त्याच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रयत्न एसटी करीत असल्याने प्रवाशांच्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी महामंडळाने राज्यातील सवलत धारक प्रवाशांसाठी बुधवार पासून स्मार्ट कार्ड प्रणाली जाहीर केली. विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक असे ३१ घटकांना एसटी प्रवासात सवलत दिली जाते. या प्रवाशांना एसटी नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) देणार आहे. या कार्डसाठी प्रवाशांना १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर या कार्ड मध्ये प्रवासाची रक्कम ५०, १०० रुपयात जमा करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात धावणाऱ्या बेस्टच्या कार्डसाठी १०० रुपये आहेत तर नव्याने सुरु झालेल्या मेट्रोसाठी स्मार्ट कार्ड मोफत दिला जात आहे.

विशेष म्हणजे मेट्रोच्या एका कार्ड मध्ये शहरातील इतर सार्वजनिक सेवेची तिकिटे काढता येतात पण राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या एसटी या शासकीय सेवेला या कार्ड मध्ये स्थान नाही. एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी १९९ रुपये आकारण्यात कोणत्या कार्ड पुरवठादाराचे चांगभले करण्याचा उद्देश आहे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. सर्वसामान्य नागरीकांच्या हक्काची वाहतूक व्यवस्था असलेल्या एसटीच्या स्मार्ट कार्डला दोनशे रुपये आकारणे अयोग्य आहे असे मत प्रवाशी व्यक्त करीत आहे.

एसटी ही राज्यातील जनतेची जीवनवाहिनी आहे. तिच्या स्मार्ट कार्डसाठी इतकी मोठी रक्कम आकारणे चुकीचे आहे. वास्तविक हे कार्ड मोफत दिले पाहिजे पण त्याची किमंत आकारायची आहे तर ती बेस्ट पेक्षा जास्त असता कामा नये. अशा प्रकारे प्रवाशांच्या खिशातून दुप्पट पैसे वसुल करणे आयोग्य आहे. – मच्छिद्र पाटील, सचिव, कोल्हापूरवासिय प्रवासी संघटना, मुंबई.