मुंबई : इंधन आणि सुटे भागाची दरवाढ झाल्याने यंदाही एस टी ची दोन टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावला.

अगोदर एसटीच्या वेळा पाळा अशा शब्दात त्यांनी भाडेवाडीच्या प्रस्तावावर बोलताना अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. गेल्या वर्षी १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांच्यात नाराजी होती. अशा वेळी दोन टक्के दरवाढ पुन्हा करण्याचा प्रस्ताव महामंडळाने मांडला होता.

“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील,” असा संदेश देण्याची गरज असल्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या बैठकीत दिला. प्रशासनाला वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळे प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणे म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणे,” असे ते म्हणाले.

उशीर, बिघाड आणि रद्द फेऱ्यांवर नाराजी

दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात बंद पडणे किंवा अचानक फेऱ्या रद्द होणे — या तक्रारींचा पाऊस प्रशासनावर पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगार पातळीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करून प्रत्येक फेरी नियोजित वेळी सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले.

वक्तशीर मुळे उत्पन्न वाढते

“प्रत्येक वेळेवर सुटणारी बस म्हणजे वाढत्या उत्पन्नाकडे जाणारे एक पाऊल,” असे सांगत त्यांनी वक्तशीरपणाचा थेट संबंध महसुलाशी जोडला. वारंवार होणाऱ्या उशिरामुळे हक्काचा प्रवासी खाजगी पर्यायांकडे वळतो, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

उत्पन्नवाढीसोबत खर्चावरही लगाम

एसटीचा वाढता दैनंदिन खर्च लक्षात घेता, उत्पन्नवाढीसोबतच काटकसरीचे धोरण काटेकोरपणे राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध देखभाल, संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि व्यवस्थापनातील शिस्त यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

“वक्तशीरपणा हीच एसटीची नवी ओळख ठरली पाहिजे,” या शब्दांत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला सज्ज होण्याचे आवाहन केले.

प्रवाशांचा विश्वास जपणारी, वेळेवर धावणारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारी एसटी हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.