मुंबई : ऐन गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाने साध्या बसच्या तिकीट दरात १० टक्के वाढ केली. त्यामुळे एसटीने प्रति टप्पा १२ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर महामंडळाने एसटी प्रवाशांना आणखी एक धक्का दिला आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या प्रवासभाडयात प्रति प्रवासी २ रुपये स्वच्छता अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना नियमित वेळेत बस उपलब्ध करून देण्याबरोबरच महामंडळ बस स्वच्छ करणे, बसस्थानक परिसर व प्रवासी प्रतिक्षालय स्वच्छ करत असते. मात्र महामंडळाकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे स्थानिक पातळीवर कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करून घेण्यात येते. मात्र कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी स्वच्छता अपेक्षेप्रमाणे दर्जेदार नसल्याने स्वच्छतेबाबत तक्रारी निर्माण होत आहेत.

एसटी महामंडळाची राज्यभरात २५१ आगारे व ५९८ बसस्थानके आहेत. तसेच महामंडळाच्या बसमधून दैनंदिन सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांना स्वच्छ बस उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर स्वच्छ बसस्थानक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यास शासनाकडून संदर्भित पत्राद्वारे मान्यता मिळाली आहे.

या निर्णयानुसार १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून प्रवासी भाडयात स्वच्छता अधिभाराची आकारणी करण्यात येणार आहे. प्रति प्रवासी २ रुपये याप्रमाणे शुल्क आकारण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी काढले आहे.

एसटीमधील दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारणी करून स्वच्छता अधिभारापोटी प्राप्त होणाऱ्या निधीतून प्रवाशांना व एसटी कर्मचाऱ्यांना अधिक दर्जेदार स्वच्छताविषयक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. तसेच स्वच्छ असणाऱ्या एसटीकडे प्रवासी वर्ग अधिक वळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे.

प्रवासी वर्गाद्वारे स्वच्छता अधिभार रक्कम आकारली जाईल

  • तिकीटधारी प्रत्येक प्रति प्रवासी दोन रुपये आकारले जातील.
  • विशेष बससेवेअंतर्गत देण्यात येणाऱ्या बससाठी प्रति दिन प्रति बस ५० रुपये आकारले जातील.
  • आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेअंतर्गत पासधारक प्रवासी ५ रुपये आकारले जातील.
  • महिला सन्मान योजना व ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षावरील व ७५ वर्षा पर्यंतचे ज्येष्ठ नागरिक), अमृत ज्येष्ठ नागरिक, अन्य सर्व सवलतधारी प्रवाशांकडून दोन रुपये आकारले जातील.
  • विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अधिभारापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांबाबत मासिक पास, अहिल्याबाई होळकर विद्यार्थीनी पास, मानवविकास, सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना घरी जाणे यासाठी अधिभार आकारला जाणार नाही.
  • सद्यस्थितीत सर्व आगारात ईटीआय मशीनद्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. ईटीआय मशीनमध्ये असलेल्या टप्पा व दरपत्रकामध्ये स्वच्छता अधिभाराचा समावेश ईबिक्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्याद्वारे आवश्यक ते तांत्रिक बदल केले जातील.