अघोषित संपासाठीही वेतनकपात?

एसटीचा १३३ कोटी रुपयांचा महसूल बुडाला

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

एसटीचा १३३ कोटी रुपयांचा महसूल बुडाला; दोन वर्षांत दोन एसटी संपांचा फटका

वेतनवाढ मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांकडून दोन मोठे संप करण्यात आले. या दोन्ही संपांमुळे एसटी महामंडळाचा एकूण १३३ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. मात्र या दोन संपानंतरही कर्मचाऱ्यांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही. त्याउलट गेल्या वर्षीच्या संपात कर्मचाऱ्यांची वेतन कपात केल्यानंतर आता अघोषित  संपातही दोन दिवसांचे वेतन कपात करण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे.

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ मिळावी यासह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या वर्षीच्या दिवाळीत म्हणजेच १६ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून चार दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह अन्य चार संघटनांनीही पाठिंबा दिल्याने संप यशस्वी झाला. मात्र यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाला भाऊबीजेच्या दिवशी सरासरी २२ ते २५ कोटी रुपयांच्या दरम्यान उत्पन्न मिळते. या उत्पन्नावरही एसटी महामंडळाला संपात पाणी सोडावे लागले होते. गर्दीचा काळ असल्याने त्यावेळी चार दिवसांच्या संपामुळे एकूण १०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला होता. यानंतर महामंडळाने संपात सहभागी झालेल्यांवर कारवाईचा बडगा म्हणून चार दिवसांची पगार कपात केली होती.

सात महिन्यांनंतरही ठोस निर्णय न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा ८ आणि ९ जून २०१८ रोजी अघोषित संप केला. त्यामुळेही महामंडळाला मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सुमारे ३३ कोटी रुपयांचा महसूल तर बुम्डालाच. त्याव्यतिरिक्त १९ शिवशाही बसगाडय़ांचे नुकसानही झाले. या अघोषित संपातही १,५०० कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि १०० जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

एसटी महामंडळाने गंभीर गुन्ह्य़ांवरील कारवाई वगळता इतर प्रकारच्या कारवाईतून त्यांना मुक्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट जरी केले असले तरी त्यासाठी थोडा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अघोषित संपात कामावर गैरहजेरीच्या कालावधीकरिता प्रति दिवसासाठी आठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. त्याऐवजी गेल्या वर्षीप्रमाणे संपाच्या दिवशीचेच वेतन कपात करण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले.

संघटनेचा दावा

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून रविवारी प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले. यात महामंडळाने संघटनेसोबत झालेल्या बैठकीत ४,८४९ कोटी इतक्या रकमेचे वाटप संघटनेच्या सूत्राप्रमाणे करण्यात येणार असल्याचे मान्य केल्याचे सांगितले. वार्षिक वेतनवाढीचा दर आणि घरभाडे भत्त्याचा दर सातव्या वेतन आयोगानुसार, राज्य शासन त्यांच्या कर्मचाऱ्यांस ज्या तारखेपासून लागू करेल त्या तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल, असे मान्य केल्याचेही सांगण्यात आले आहे.

वेतनवाढीचे आश्वासन तोंडीच?

वेतनवाढीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व अन्य कामगार संघटनांच्या उपस्थितीत एसटी प्रशासनासोबत शनिवारी दुपारी तीन वाजता बैठक झाली. मात्र ही बैठक फोल ठरली. त्यानंतर ‘सह्य़ाद्री’ येथे परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते, एसटी अधिकाऱ्यांसोबत संघटनांची दुसरी बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणतेही लेखी आश्वासन न मिळता फक्त तोंडी आश्वासनावरच समाधान मानावे लागले.

एसटी सेवा पूर्ववत

गेले दोन दिवसांच्या अघोषित संपामुळे एसटी ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. रविवारी मात्र एसटी सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. संपात मुंबई, ठाणे, पालघर, पश्चिम महाराष्ट्रासह, कोकणाला सर्वात जास्त फटका बसला होता. मात्र या जिल्ह्य़ांत बस गाडय़ा सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msrtc staff on strike

ताज्या बातम्या