एसटीच्या आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न ; वातानुकूलित शयनयान बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी

खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या.

एसटीच्या आरामदायी प्रवासासाठी प्रयत्न ; वातानुकूलित शयनयान बससाठी एसटी महामंडळाची चाचपणी
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई: खासगी प्रवासी कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांसाठी वातानुकूलित शयनयान बस सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभरातील बस ओनर्स असोसिएशनच्या प्रदर्शनाला एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली. या अधिकाऱ्यांमध्ये महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचाही समावेश होता. प्रदर्शनात विविध बसचीही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शयनयान बसचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी आपल्या ताफ्यात शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाडय़ा समाविष्ट केल्या होत्या. मात्र जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे महामंडळाने त्याच्या भाडेदरात कपात केली. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा बंदच करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाचा वातानुकूलित शयनयान प्रयोग पूर्णपणे फसला होता. वातानुकूलित बसगाडय़ांनंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये एकाच बसमध्ये शयनयान व आसन सुविधा असलेली विनावातानुकूलित बसही ताफ्यात दाखल करण्यात आली. स्वमालकीच्या बस असलेल्या या सेवांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या अशा २१६ बस ताफ्यात आहे.

पुन्हा वातानुकूलित शयनयान प्रकारातील बस ताफ्यात दाखल करण्याचा एसटी महामंडळाचा विचार आहे. नुकतीच हैदराबाद येथील बस प्रदर्शनाला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. या प्रदर्शनात बस उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांच्या आरामदायी शयनयान वातानुकूलित बसही होत्या. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३६ शयनयान असलेली साडेतेरा मीटर लांबीच्या बसची पाहणी केली. व्होल्वोची बस बरीच आरामदायी असल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासह अन्य कंपन्यांच्या शयनयान बसगाडय़ांचीही माहिती घेण्यात आली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे वातानुकूलित शयनयान बस नाही. या बस

लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवण्याचाही विचार होऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

विनावातानुकूलित ५० शयनयान बस

एसटी महामंडळ टाटा कंपनीकडून ७०० विनावातानुकूलित बस घेणार आहे. यापैकी ५० बस विनावातानुकूलित शयनयान प्रकारातील असल्याचेही सांगण्यात आले. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत या बस ताफ्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अटक मार्गदर्शक सूचनांबाबत पोलीस कर्मचाऱ्याने ३० ऑगस्टपर्यंत जागरूक व्हावे, ; राज्यातील सर्व पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी