मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरूच ठेवली असून, गेल्या दोन दिवसांत आणखी १२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे एकू ण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार १७८ झाली असून ११ नोव्हेंबपर्यंत एकूण २ हजार ५३ कर्मचारी निलंबित झाले होते. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली असून त्यामुळे स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील एसटी चालवण्याचे प्रमाण रविवारी वाढले. राज्यात १०४ गाडय़ा धावल्याची माहिती महामंडळाने दिली. धावत असलेल्या गाडय़ांमध्ये रविवारी ६० पैकी ५० मार्गावर शिवशाही, शिवनेरी गाडय़ाच चालवण्यात आल्या. दरम्यान, विलीनीकरणाच्या मागणीवर काही कर्मचारी ठाम असून संप सुरूच ठेवला आहे.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीत, रविवारीही कर्मचारी परतणाऱ्यांची संख्या वाढली. शनिवारी ३ हजार १६६ कर्मचारी कामावर रुजू झाले असतानाच रविवारी हीच संख्या ३ हजार ९८७ पर्यंत पोहोचली. यात चालक १९५ आणि ७७ वाहक आहेत. शनिवारी १११ चालक आणि ३२ वाहक कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यामुळे स्वमालकीच्या आणि खासगी शिवशाही, शिवनेरीबरोबरच साध्या बसही चालवण्याची संख्या काहीशी वाढली.

कृती समिती शांत

मागण्यांसाठी एसटीतील १७ लहान-मोठय़ा कामगार संघटनांनी एक कृती समिती स्थापन के ली असून, या समितीत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, शिवसेनेची महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) यासह अन्य संघटनांचा समावेश आहे. विलीनीकरणाच्या मागणीला कृती समितीचा पाठिंबा असला तरीही सुरू असलेल्या संपाला मात्र जाहीररीत्या पाठिंबा दिलेला नाही. यावर उघडपणे भाष्य करण्यासाठी कृती समितीतील एकही नेता पुढे आला नाही.

सरकारमुळेच आत्महत्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच ४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तातडीने राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करावे, अशी मागणी केली.