मुंबई : एसटीमध्ये सुमारे पाच हजार चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आह़े  याबाबत दोन दिवसांत जाहिरात काढण्यात येणार आह़े

शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या संपादरम्यान  चालकांविना एसटी प्रवाशांचे हाल झाले होते. एसटी महामंडळाने कंत्राटी चालक भरती करून एसटी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. संप मिटताच कंत्राटी चालकांची संख्या कमी केली. तसेच मुदत संपलेल्या काहींना मुदतवाढही देण्यात आली. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांचा समावेश आहे.

आता पुन्हा एसटी महामंडळाने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसटीचे २९ हजारांपेक्षा जास्त चालक आहेत. काही चालक अन्य विभागांत बदली झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनंतर पुन्हा आपल्या मूळ भागात बदली करून घेतात. त्यामुळे आधी बदली झालेल्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता भासते. चालकांअभावी एसटी गाडय़ाही आगारात उभ्या राहतात. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकण विभाग, पुणे विभागासह अन्य काही विभागांत ही समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही कंत्राटी चालकभरती करण्यात येणार आहे.

प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय 

एसटीत प्रतीक्षा यादीवरील दोन हजारांहून अधिक उमेदवार असून, त्यातील बहुसंख्य चालक- वाहक आहेत. दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही त्यांना अद्यापही सेवेत घेण्याचा निर्णय झालेला नाही. ‘‘प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीत निवृत्त कर्मचारी संख्या वाढल्यास त्यांची भरती होईल. याबाबत लवकरच निर्णय होणार आहे’’, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले.

पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़  ही भरती टप्प्याटप्प्याने होईल़  याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल़  

शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ