मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांपैकी एक वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २३ ते २५ जून या कालावधीत प्रात्याक्षिक तर २९ जून ते ९ जुलै या कालावधीत सैद्धांतिक परीक्षा हाेणार आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एक वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा जून व जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. २३ ते २५ जून या कालावधीत प्रात्याक्षिक तर २९ जून ते ९ जुलै या कालावधीत सैद्धांतिक परीक्षा हाेणार आहे. सैद्धांतिक परीक्षा बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने व प्रात्यक्षिक परीक्षा ही नियमित पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक विषयाची प्रश्नपत्रिका मंडळाद्वारे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयामार्फत संस्थांना पुरविण्यात येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न परीक्षेची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी १५ ते २० जून २०२६ या कालावधीत प्रात्याक्षिक दिले जाणार आहे. वेळापत्रक विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने जाहीर केले आहे. दरम्यान अभ्यासक्रमनिहाय आणि विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून, परीक्षा प्रक्रियेबाबतची कार्यपद्धती देखील तपशीलवार वेळापत्रकासोबत जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा कधी ?
२३ जून रोजी प्रात्यक्षिक परीक्षा १ , २४ जून रोजी रचनात्मक मूल्यांकन आणि प्रात्यक्षिक परीक्षा २, २५ जून रोजी रचनात्मक मूल्यांकन आणि प्रात्यक्षिक परीक्षा ३ होणार आहे. तसच २९ जून ते ९ जुलै दरम्यान सैद्धांतिक १ ते ३ परीक्षा हाेणार आहे. सैद्धांतिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सर्व परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहेत.
