निशांत सरवणकर

महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) आणि भारत संचार निगम (बीएसएनएल) यांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आता मुंबई आणि दिल्लीतील ‘एमटीएनएल’ची सेवा ही भविष्यात ‘बीएसएनएल’कडून पुरविली जाणार आहे. त्यामुळे ही दोन शहरे आता ‘बीएसएनएल’च्या अखत्यारीत आली असली, तरी या शहरांना फोर जी सेवा मिळण्यासाठी  प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘एमटीएनएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार यांनी दूरसंचार विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात ही शक्यता वर्तविली आहे. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. एमटीएनएल ग्राहकांना फोर जी सेवेचा लाभ देण्यासाठी असलेल्या आव्हानांचा ऊहापोह त्यांनी पत्रात केला आहे. या आव्हानांचा विचार केल्यास एमटीएनएल ग्राहकांना प्रत्यक्षात फोर जी सेवा मिळण्यासाठी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे या पत्रावरून स्पष्ट दिसून येत आहे.

२० हजार कोटींच्या कर्जात असलेल्या ‘एमटीएनएल’ला फोर जी सेवेचा प्रारंभ करण्यासाठी स्वत:हून भांडवल उभारणे अशक्य आहे. त्यातच ‘एमटीएनएल’ने साडेसात हजार कोटींचे रोखे उभारण्याची केलेली मागणी दूरसंचार विभागाने हजार रुपये इतकी मर्यादित केली आहे, याकडे सुनील कुमार यांनी लक्ष वेधले आहे. ‘बीएसएनएल’ने त्यांच्या मोबाइल सेवेचे जाळे वापरण्यासाठी ‘एमटीएनएल’ला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे ही सेवा ‘एमटीएनएल’ला वापरता येईल, असे वरकरणी दिसत असले तरी त्यात तांत्रिक अडचणी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी एमटीएनएलला अनुदानित कंपनी असा दर्जा देण्याऐवजी बीएसएनएलमध्ये पूर्णपणे सामावून घेणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक ते दोन वर्षांचा कालावधी दूरसंचार विभागाने दिला आहे. मात्र तोपर्यंत ‘एमटीएनएल’च्या ग्राहकांना फोर जी सेवेचा पूर्णत: लाभ मिळण्यात अडचणी येणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

मुंबई व दिल्लीसाठी आवश्यक असलेल्या परवान्यासह फोर जी स्पेक्ट्रम थेट बीएसएनएलला दिले गेले तर वर्षभरात हा प्रश्न तडीस जाऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त करून, तोपर्यंत ‘बीएसएनएल’ने रोमिंग सेवा पुरविणाऱ्या दिल्ली व मुंबईतील फोर जी सेवाधारकांसह करार करावा, असेही सुनील कुमार यांनी स्पष्ट केले आहे. ‘एमटीएनएल’कडील मोबाइल सेवा ‘बीएसएनएल’कडे हस्तांतरित केल्यानंतर सध्या असलेल्या थ्री जी सेवेचे रूपांतर फोर जी सेवेत करता येऊ शकेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या सर्व मुद्दय़ांकडे दूरसंचार विभागाने लक्ष देऊन आदेश पारित करावेत, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरती पेन्शन? 

* ‘महानगर टेलिफोन निगम’मधून (एमटीएनएल) स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना आता तात्पुरते निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत ही सवलत मिळणार असल्याचे कळते. यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

* एमटीएनएलच्या दिल्ली व मुंबईतील सुमारे १४ हजार ३८७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. हे कर्मचारी ५० ते ५७ वर्षे वयोगटातील आहेत. या सर्वाना स्वेच्छानिवृत्तीचे लाभ मिळण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कर्मचाऱ्यांना डिसेंबर व जानेवारी महिन्याचे वेतनही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हे सर्व कर्मचारी चिंतेत असताना त्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन देण्याचे ठरविण्यात आल्यामुळे दिलासा मिळणार आहे.

* कर्मचाऱ्याच्या पेन्शन किंवा वेतन खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले वेतन खाते बंद करू नये, असे आवाहन एमटीएनएल मुंबईचे महाव्यवस्थापक (वित्त) एन. एस. धाकतोडे यांनी केले आहे. निवृत्तीनंतर ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनाचा लाभ मिळतो. या पाश्र्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत निवृत्तिवेतन मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.