रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाआधी अन्न सेवा करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास आठवडाभर मुंबईतील सर्व अनाथआश्रम आणि वृद्धाश्रमात ही अन्न सेवा सुरु असणार आहे. आकाश अंबानी व्यावसायिक रशेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत विवाहबद्ध होणार आहे. श्लोका मेहताचं कुटुंबदेखील अन्न सेवेत सहभागी झालं होतं. जवळपास दोन हजार मुलांना यावेळी जेवण वाढण्यात आलं. यावेळी लहान मुलांसाठी म्युजिकल फाऊंटशन शोदेखील आयोजित करण्यात आला होता.

मुलगी इशा अंबानीच्या लग्नावेळीही अंबानी कुटुंबाने अशाच प्रकारे अन्न सेवा केली होती. अंबानी कुटुंबाकडून राजस्थानातील उदयपूर येथे 5100 लोकांच्या जेवण्याची सोय करण्यात आली होती. विशेष म्हणजे लोकांसाठी तिनही वेळा जेवण्याची सोय होती. अंबानी कुटुंबाने स्वत: लोकांना अन्न वाढलं होतं.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील निवासस्थानी अंबानी कुटुंबाने म्युझिकल नाइटसोबत सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर स्वित्झर्लंडमध्येही तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूरसारख्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली. कोल्डप्ले आणि चेनस्मोकर्सने यावेळी परफॉर्म केलं होतं.

श्लोका मेहता हिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायंसची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला. इतंकच नाही, तर श्लोका ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची सहसंस्थापिकाही आहे. ही संस्था विविध एनजीओंना मदत करते.