मुकेश अंबानी धमकी प्रकरण : दहशतवादी अफजल गुरूच्या नावाने दूरध्वनी; आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विष्णू भौमिकने दूरध्वनी करून आपण दहशतवादी अफजल गुरू बोलत असल्याचे सांगून धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुकेश अंबानी धमकी प्रकरण : दहशतवादी अफजल गुरूच्या नावाने दूरध्वनी; आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या विष्णू भौमिकने दूरध्वनी करून आपण दहशतवादी अफजल गुरू बोलत असल्याचे सांगून धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने नऊ वेळा एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दूरध्वनी करून धमकी दिली होती. याप्रकणी न्यायालयाने त्याला  २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

रिलायन्स फाऊंडेशनच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास आरोपीने पहिला धमकीचा दूरध्वनी केला होता. त्यानंतर दोन तासांत एकूण ९ वेळा दूरध्वनी केले होते. त्यात त्याने मुकेश अंबानी यांना धमकी दिली. तसेच आरोपीने शिवीगाळही केली होती. एका दूरध्वनीमध्ये धीरुभाई अंबानी यांचाही उल्लेख केला. आपण दहशतवादी अफजल गुरू बोलत असल्याचे त्याने दूरध्वनीवरून सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपीने धमकावण्यासाठी संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचेच नाव का वापरले, त्याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दहिसरचा रहिवासी असलेल्या विष्णू भौमिकचे दक्षिण मुंबईत सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. दहिसरमधील आयसी कॉलनीतील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली. आरोपींवर पूर्वीही अशा प्रकारे कृत्य केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद असल्याची शक्यता पोलिसांना आहे. धमकी देताना त्याने स्वत:च्या मोबाइल क्रमांकाचा वापर केला. त्यामुळे त्याचा शोध घेणे सोपे झाले. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

विष्णूची मानसिक स्थिती ठीक नसून त्यावर उपचार सुरू असल्याचे आरोपींच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यावेळी २०२१ मध्ये डॉक्टरांनी जारी केलेले प्रमाणपत्रही सादर करण्यात आली. विष्णूवर अद्याप उपचार सुरू असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितले. तसेच त्याचा धमकावण्याचा उद्देश नसल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी कलमांत बदल करावा, तसेच आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली. त्याला सरकारी पक्षाकडून विरोध करण्यात आला. आरोपीने १५ ऑगस्टलाच धमकीचा दूरध्वनी का केला? त्याने ठरवून हा प्रकार केला असून तो मनोरुग्ण असला त्याने एकदा नाही तर ९ वेळा दूरध्वनी केला आहे.  हा प्रकार अतिशय गंभीर असून यापूर्वीही त्याने अनेक वेळा असे कृत्य केले आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केला आहे का?, ते जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोपीने दूरध्वनी क्रमांक कुठून मिळवला, दहशतवाद्यांशी त्याचा खरचं संबध आहे का याचाही तपास करणे गरजेचे असून १० दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली.

आरोपी कुठल्याही दहशतवाद्यांशी संबध नाही. तो मुंबईत उच्चभ्रू सोसायटीत राहत आहे.  त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी ही विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. अखेर न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mukesh ambani threat case terrorist afzal guru calls accused police custody ysh

Next Story
तुरुंगवासादरम्यानच्या वेतनाची सेवानिवृत्त शिक्षकाची मागणी न्यायालयाने फेटाळली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी