मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये २ हजार ४३७ कोटी रुपयांची ओवाळणी जमा केली आहे. महिला व बाल विकास विभागाने ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचे वितरण पूर्ण केले असून, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून दरमहा पात्र महिलांना आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेत देण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांना या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.
योजनेतील लाभार्थींच्या संख्येत पडताळणीमुळे मोठी घट झाली आहे. एप्रिलअखेर करण्यात आलेल्या पडताळणीनंतर राज्यात १ कोटी ६५ लाख ५३ हजार महिला पात्र ठरल्या होत्या. तर विविध निकषांची पूर्तता न करणाऱ्या सुमारे ९२ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे योजनेच्या सुरुवातीच्या तुलनेत लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
लाभार्थींच्या पात्रतेची पडताळणी अद्यापही सुरू आहे. त्यामुळे दर महिन्याला अनुदान वितरित करताना लाभार्थींच्या संख्येत काही प्रमाणात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करतानाही पात्र लाभार्थींची संख्या सुमारे ७० हजारांनी कमी झाली आहे.
यामध्ये विशेषतः ६५ वर्षांची वयोमर्यादा पूर्ण झालेल्या महिला तसेच आधार प्रमाणीकरण, बँक खाते आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे काही महिलांना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून सुमारे ७० हजार महिला वंचित राहिल्या आहेत.
गुरुवारी सायंकाळपर्यंत लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ४१ लाख ५३ हजारांच्या आसपास होती. त्यानंतरच्या पडताळणी व वितरण प्रक्रियेत आणखी बदल झाल्याने अंतिम लाभार्थी संख्या १ कोटी ६४ लाख ८२ हजार इतकी झाली. त्यामुळे योजनेतील पात्रतेची प्रक्रिया सातत्याने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात ऑगस्टचा हप्ता जमा झाल्याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारकडून महिलांना आर्थिक स्वरूपाची ओवाळणी मिळाली आहे.
