मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा महिला व बालविकास विभागाने केली. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८१ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा एक्सवरून केली.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, महिला व बालविकास विभागाने सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याची सक्ती केली होती. त्यानुसार लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना प्रतिमहिना मिळणारा लाभ मिळत नसल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु झाली होती. त्याशिवाय या योजनेतील इतरही अनेक तक्रारी समोर आल्यामुळे याची गंभीर दखल महिला व बालविकास विभागाने घेतली आहे. परिणामी लाभार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून १८१ या क्रमांकांची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ईकेवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे आणि शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार असल्याचे एक्सवरील संदेशात जाहीर केले आहे.
