अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा कालच कारागृहातून जामिनावर सुटून घरी परतला. २ ऑक्टोबरपासून त्याच्यासंदर्भात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींबद्दल त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी भाष्य केलं आहे. आर्यनविरोधातली केस NCBने फार खेचली, असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं आहे. आर्यनविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

याबद्दल त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. रोहतगी म्हणाले, तपास यंत्रणा लोकांना अटक झाल्यानंतर तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न करतात. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणांना संवेदनशील करणे तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या जामिनाच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले, या प्रकरणात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे- आर्यनकडे कोणतंही ड्रग सापडलं नाही. तो अरबाझ मर्चंट सोबत तिथे होता आणि दुसरं म्हणजे त्याने ड्रग्जचं सेवन केल्याचे, सोबत बाळगल्याचे किंवा विक्री-खरेदी केल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. तरी NCB ने हे प्रकरण व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ते लांबलं.

हेही वाचा – “तो नशीबवान होता म्हणून नाहीतर…”, आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदेंचं मोठं वक्तव्य

ते म्हणाले, “कायदा विशेषत: एक फरक करतो आणि जर एखादा अल्प प्रमाणात ग्राहक असेल तर त्याच्याशी वेगळी वागणूक दिली जाते. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सी हा फरक करण्यात अपयशी ठरतात. जर अल्प प्रमाणात ड्रग्जचे सेवन केल्याचं वापरकर्त्याने कबूल केलं तर त्याला अटक केली जाऊ शकत नाही. जोपर्यंत तो पुनर्वसनासाठी तयार आहे, तोवर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. २००१मध्ये कायद्याने हेच सांगितले होते, मात्र दुर्दैवाने ते दृष्टीआड झाले”.