मुंबई : ज्यांच्या गायकीत प्रतिभा आणि विचारांचा झंकार आहे, असे दिग्गज गायक पंडित मुकुल शिवपुत्र आणि  महाराष्ट्रास  ‘प्रयोगशील गायनीकळे’ने ज्यांनी मोहवून टाकले आहे, ते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे. हे आहेत ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे यंदाचे मानकरी. साहित्य, संस्कृती आणि कलेच्या या ऐश्वर्यसंपन्न उत्सवात पं. मुकुल शिवपुत्र यांच्या गाण्याची दुर्लभ बैठक होणार आहे, तर राहुल देशपांडे सादर करणार आहेत खास ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’साठी रचलेला ‘मला भावलेले कुमार आणि वसंतराव’ हा गीतोत्सव. याच प्रमाणे या सोहळ्यात सादर होणार आहे ‘शागीर्द’ हा वाद्यसंगीताचा विशेष कार्यक्रम. यात सहभागी होणार आहे शास्त्रीय संगीतातील गाजलेल्या कलावंतांची पुढची पिढी, त्यांचे ‘शागीर्द’.

मराठी शास्त्रीय आणि नाट्य संगीताच्या विश्वातील कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे ही दोन गानशिखरे. दोघेही प्रतिभावंत. दोघांचीही स्वत:ची खास शैली. कुमार गंधर्व हे भारतीय संगीतातील एक बडे बंडखोर. तर ‘हमारा घराना हमारेसे ही शुरू हुआ’ असे सांगणारे वसंतराव. या दोघांच्या गाण्यांवर कानसेनांच्या पिढ्या वाढल्या. त्यांची काही खास गाणी सादर करतानाच त्या गाण्यांची, त्यांच्या गायनीकळेची खुबी, खासीयत, मर्मस्थाने, त्यांचा गीतविचार ‘मला भावलेले कुमार आणि वसंतराव’ या गीतोत्सवातून राहुल देशपांडे उलगडून दाखवणार आहेत.

पं. मुकुल शिवपुत्र हे कुमार गंधर्व यांचे पुत्र, तर भानुमती या त्यांच्या माता. घरातून ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार झालेले पं. मुकुल शिवपुत्र हे आज कुमारांप्रमाणेच एक प्रतिभाशाली आणि बंडखोर गायक म्हणून ओळखले जातात. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर अशा विविध घराण्यांच्या संस्कारातून तेजाळलेली त्यांची गायकी, ख्याल, भक्तिसंगीताबरोबरच पुन्हा कुमारांप्रमाणेच लोकगीतांचा लहेजा ल्यालेली त्यांची गाणी, हे ऐकणे हा आनंदाचे डोही आनंद तरंग उमटवणारा सोहळा.

त्यांच्या गाण्यांची बैठक याचि कानी अनुभवण्याची संधी यंदाच्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’मधून रसिकांना लाभणार आहे. ‘शागीर्द’ या संगीताच्या कार्यक्रमात यज्ञेश रायकर (व्हायोलिन), युवराज सोनार (बासरी), इशान घोष (तबला), श्रावण सम्सी (ड्रम्स) आणि कौशिकी जोगळेकर (कीबोर्ड) हे गाजलेल्या कलावंतांचे ‘शागीर्द’ आपली संगीतसेवा रुजू करणार आहेत.