scorecardresearch

Premium

बहुपेडी लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन

आवडत्या विषयांचे अवलोकन करताना त्यावर लोकांना आपलेसे वाटेल अशा खुसखुशीत, नर्मविनोदी शैलीत भाष्य करणारे बहुपेडी लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे मंगळवारी निधन झाले.

shirish kanekar 23
शिरीष कणेकर

मुंबई : आवडत्या विषयांचे अवलोकन करताना त्यावर लोकांना आपलेसे वाटेल अशा खुसखुशीत, नर्मविनोदी शैलीत भाष्य करणारे बहुपेडी लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ऐंशी वर्षांचे होते. कणेकर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदूुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुपारी साडेबाराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या लेखनातून आणि एकपात्री कार्यक्रमांतून वाचकांना हसवणारी ‘कणेकरी’ लेखणी शांत झाली, अशी भावना रसिकजनांकडून व्यक्त होत आहे.

क्रिकेट, मनोरंजन आणि विविधांगी विषयांवरील ललितलेखन, शैलीदार लेखनासाठी शिरीष कणेकर प्रसिद्ध होते. मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मधून पत्रकारितेला सुरुवात केली. काही वर्षे पत्रकार म्हणून इंग्रजी वृत्तपत्रातून काम केल्यानंतर त्यांनी स्तंभलेखनास सुरुवात केली. क्रिकेट हा त्यांचा आवडता विषय. क्रिकेटच्याच विषयावरील त्यांचे विविधांगी लेखन वाचकांना भावले. पत्रकारितेत असल्याने कलाकारांशी भेटीगाठी होत असत, चित्रपटांचीही आवड त्यांना होती. त्यामुळे कधी कलाकारांविषयी तर कधी चित्रपटाविषयी अशा आवडत्या विषयांवरच्या लेखनातील त्यांची मुशाफिरी वाढली. जे लिहिले तेच लोकांसमोर रंगमंचीय एकपात्री कार्यक्रम स्वरूपात सादर केले. क्रिकेटपासून राजकारणापर्यंत कोणत्याही विषयावर मुक्तचिंतन पद्धतीचे काहीसे मिश्कील, नर्मविनोदी शैलीत भाष्य असलेले त्यांचे लिखाण वाचकांना आवडू लागले. त्यांची हीच लेखन-संवाद शैली ‘कणेकरी शैली’ म्हणून ओळखली गेली.

ajit pawar and chandrakant pati
अग्रलेख: भाजपचे बालक-पालक!
kamal-haasan-suicidal thoughts
कमल हासन यांच्याही डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार; तरूणांशी संवाद साधताना अभिनेत्याचा मोठा खुलासा
barrister Mr. Nath, member of parliament, konkan railway, Praja Socialist Party, politician
सुसंस्कृत राजकारणी दुर्मीळ असताना बॅ. नाथ पै यांची आठवण हवीच…
pankaj tripathi in loksatta gappa event,
करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

‘लोकसत्ता’मध्ये त्यांनी ‘यादों की बारात’, ‘शिरीषासन’, ‘सिनेमाबाजी’, ‘मुद्दे आणि गुद्दे’, ‘चहाटळकी’, ‘सूरपारंब्या’ असे अनेकविध विषयांवरील स्तंभलेखन केले. ‘कणेकरी’, ‘नट बोलट बोलपट’, ‘शिरीषासन’, ‘पुन्हा शिरीषासन’, ‘माझी फिल्लमबाजी’, ‘शिणेमा डॉट कॉम’ पुस्तके लोकप्रिय झाली. ‘आंबटचिंबट’, ‘इरसालकी’, ‘एकला बोलो रे’, ‘फटकेबाजी’, ‘मेतकूट’ हे त्यांचे ललितलेखनही गाजले. ‘मी माझं मला’ या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले.

१९६९ च्या काळात त्यांच्या लेखनाचा फार प्रभाव होता. त्यावेळी मराठीमध्ये सिनेमांबद्दल फार कमी लिखाण प्रसिद्ध होत असे. त्यांच्या लिखाणाची शैली ही सामान्य लोकांना आवडेल अशी होती. सुरुवातीच्या काळात माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव फार होता पण, हळूहळू लेखनात प्रगती होत गेल्यावर माझी वेगळी शैली निर्माण झाली. – द्वारकानाथ संझगिरी, लेखक

करोनाकाळापूर्वी गेली अनेक वर्षे मी आणि कणेकर सकाळी फिरायला जायचो. त्यावेळी आमच्यामध्ये साहित्य, चित्रपट आणि खेळ या विषयावर भरपूर गप्पा व्हायच्या. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा कधी मोठेपणा केला नाही. त्यांचा चित्रपट आणि क्रिकेट या विषयांवर दांडगा अभ्यास होता. – संजय मोने, अभिनेते

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Multi faceted writer journalist shirish kanekar passed away mumbai amy

First published on: 26-07-2023 at 02:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×