मुंबई: तरुणी आपल्यासोबत बोलत नसल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी मुलुंड परिसरात घडली. या घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.पूर्व उपनगरात वास्तव्यास असलेली पीडित १६ वर्षीय मुलगी मुलुंडमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेते.
आरोपी आशिष बनसोडे (२१) हाही पूर्व उपनगरात वास्तव्यास असून तो मुलीच्या परिचयाचा आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी पीडित मुलगी महाविद्यालयात आली. आरोपीही तिचा पाठलाग करत मुलुंड येथे आला. मुलगी महाविद्यालय परिसरात पोहचताच आरोपी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र मुलीने त्याच्याशी बोलण्यास नकार देताच आरोपीने बॅगेतून कोयता बाहेर काढला आणि मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मुलीसोबत असलेल्या दुसऱ्या मित्राने कोयता पकडला. या झटापटीत मुलीच्या मित्राला किरकोळ जखम झाली. या घटनेनंतर तेथे गर्दी झाली. त्यामुळे आरोपीने तत्काळ तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीने या प्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला केल्याचे आरोपीने पोलिसांना चौकशीत सांगितले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
