मुंबई : मुलुंड पश्चिम येथील ऑफ पार्क रोड ते तानसा पाइप लाइनदरम्यान एलबीएस मार्गाला जोडणारा विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नसून, तो एका नामांकित विकासकाने बेकायदेशीररित्या प्रकल्पात समाविष्ट केल्याचा आरोप भाजपचे मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित रस्ता शोधून तो मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

एलबीएस मार्गावरील ऑफ पार्क रोड ते तानसा पाइप लाइनदरम्यानचा विकास नियोजन रस्ता (भूखंड क्रमांक ५४३, ५४४ आणि ५४७, नाहूर गाव) विकास आराखड्यात मंजूर आहे. या रस्त्याचा काही भाग विकसित करण्यात आला असला, तरी उर्वरित भाग प्रत्यक्षात उपलब्ध नसून तो संबंधित विकासकाने आपल्या प्रकल्पात समाविष्ट केल्याचा आरोप कोटेचा यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

महापालिकेच्या नियमानुसार विकास नियोजन रस्ता हा सार्वजनिक मालमत्ता असून तो महापालिकेच्या ताब्यात आणि नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित रस्ता प्रत्यक्षात उपलब्ध नसल्याने संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी. तसेच, चोरी झालेला विकास नियोजन रस्ता शोधून तो महापालिकेच्या ‘टी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या ताब्यात देण्यात यावा, अशी मागणी कोटेचा यांनी केली आहे. या तक्रारीसोबत त्यांनी विकास आराखड्याचा नकाशा आणि अन्य संबंधित कागदपत्रेही पोलिसांकडे सादर केली. यावेळी भाजपच्या नगरसेविका दीपिका घाग आणि नगरसेवक नील सोमय्या उपस्थित होते.

असा हरवला रस्ता…

माध्यमांशी बोलताना कोटेचा म्हणाले, ‘नगरसेविका दीपिका घाग यांनी त्यांच्या प्रभागात नवीन रस्ते विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला होता. तेव्हा विकास आराखड्याचा अभ्यास केला असता तानसा पाइप लाइन परिसरातून ऑफ पार्क रोडमार्गे एलबीएस मार्गाला जोडणारा महत्त्वाचा जोडरस्ता प्रस्तावित असल्याचे आढळले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरला असता. मात्र, प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता प्रस्तावित रस्त्याची जागाच उपलब्ध नसल्याचे दिसून आले’. चौकशीअंती संबंधित जागेवर एका विकासकाचा मोठा प्रकल्प उभारल्याचे आढळले. सुमारे ६० मजली इमारत, संरक्षक भिंत आणि बॅरिकेड्समुळे विकास नियोजन रस्ता प्रकल्पाचाच भाग झाल्याचे दिसून आले. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे या प्रकरणात विकासक आणि संबंधित वास्तुविशारद जबाबदार असल्याचा आरोपही आमदार कोटेचा यांनी केला.