मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड कचराभूमीची १५ एकर जागा पाच वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात सुधार समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र मुलुंड कचराभूमीच्या जागेवर गोल्फ खेळाचे मैदान तयार करण्याची मागणी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती. त्याकरीता व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेने गोल्फ टूर ऑफ इंडियाला परवानगीही दिली होती. मात्र याबाबतचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. त्यामुळे धारावी प्रकल्पासाठी भाजपच्या आमदारांचा हा प्रकल्प गुंडाळला की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्यामुळे या क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे पालिकेने मुलुंड कचराभूमी बंद करण्याचे ठरवले आहे. या कचराभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून साठलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी पालिकेने जून २०१८ कंत्राटदार नेमून कार्यादेश दिला आहे.

हे काम आता शेवटच्या टप्प्यात असून या पुनर्प्राप्त झालेल्या जमिनीवर गोल्फ मैदान साकारण्याची मागणी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती. त्यानुसार या जमिनीवर गोल्फचे मैदान तयार करता येईल का याबाबतचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया या संस्थेला डिसेंबर २०२५ मध्ये परवानगी दिली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यात या मैदानाबाबत कोणतेही सर्वेक्षण या संस्थेने केलेले नाही.

त्यातच आता धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड कचराभूमीची १५ एकर जागा देण्याचा निर्णय सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.पुनर्विकास प्रकल्पाच्या कामासाठी लागणाऱ्या कास्टिंग यार्डसाठी ही जागा पाच वर्षाच्या भाडेतत्त्वावर अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात येणार आहे. त्याकरीता ९८ कोटी ४६ लाख ८३ हजार ९१८ रुपये इतके भाडे आकारण्यात आले आहे. या जागेवर कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट उत्पादन केंद्र आणि रेडी-मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांच्या मागणीचे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संजय दीना पाटील यांची रुग्णालयाची मागणी … दरम्यान, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी मुलुंड कचराभूमीच्या जागेवर रुग्णालय उभे करण्याची मागणी केली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षात असताना त्यांनी गोल्फच्या मागणीला विरोध केला होता. मुलुंड स्थानक परिसरात पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. मात्र रुग्णालयाची मागणीही मागे पडली असून आता संजय पाटील यांनीच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवेसना (शिंदे) पक्षात प्रवेश केला आहे.

कपिल देव यांची संस्था … गोल्फ मैदानासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याकरीता मुंबई महापालिकेने गोल्फ टूर ऑफ इंडियाला परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. ही संस्था प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांची आहे. पालिकेच्या अटीनुसार महापालिकेच्या जागेवर, स्वतःच्या खर्चाने कचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पास कोणताही अडथळा न आणता, व्यवहार्यता अभ्यास करण्यास परवानगी देण्यात आली.

आहे. सर्वेक्षणादरम्यान निर्माण होणाऱ्या मुरूम/डेब्रिस इत्यादी कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच्या खर्चाने करावी, सर्व शासकीय नियम, कायदे, पर्यावरणीय निकष यांचे पालन करणे बंधनकारक आहे. ही परवानगी कोणत्याही प्रकारच्या बांधकाम, विकासकाम किंवा व्यवहार्यता तपासणीपलिकडील इतर क्रियांना मान्यता देत नाही, असेही गोल्फ टूर ऑफ इंडियाला दिलेल्या परवानगी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत आमदार मिहीर कोटेचा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नुकतेच या संस्थेशी माझे बोलणे झाले असून लवकच संस्थेचे वास्तूविशारद येऊन सर्वेक्षण करणार आहेत. उर्वरित ५० एकर जागेसाठी हे सर्वेक्षण केले जाईल असेही त्यांनी सांगितले.