मुंबई : वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान १४ फेब्रुवारीला मुलुंड येथे झालेला अपघात हा कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. सिमेंटच्या कठड्याचा तात्पुरता आधार काढल्यामुळे तो पडल्याचा निष्कर्षही चौकशी समितीने काढला आहे. त्यामुळे आता या अपघातास जबाबदार असणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अस्टाल्डी संयुक्त उपक्रम (आरएजेव्ही) कंपनीविरोधात, तसेच कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो ४ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या कामादरम्यान १४ फेब्रुवारीला मुलुंड येथे अपघात झाला होता. कामादरम्यान उंचावरून सिमेंटचा वजनदार कठडा एका रिक्षावर पडला होता. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएने कंत्राटदाराला ५ कोटींचा, तर सल्लागार कंपनीला एक कोटींचा दंड केला.

तसेच सल्लागार कंपनीची हकालपट्टीही केली. दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आणि याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीने नुकताच एमएमआरडीएला अहवाल सादर केला असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा अहवाल न्यायालयाकडेही सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार या दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

कामाच्या रचनेत व साहित्यात कोणतीही त्रुटी नसून काम मजबूत आणि सुरक्षित आहे. मात्र कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच अपघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कंत्राटदाराकडून नियुक्त करण्यात आलेल्या एका वेल्डरने नुकत्याच बांधलेल्या सिमेंटच्या कठड्याचा तात्पुरता आधार काढल्याने अपघात झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या अहवालानंतर आता एमएमआरडीए कंत्राटदाराविरोधात काय कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून काहींना अटकही करण्यात आली होती. उपकंत्राटदार कंपनीच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांविरोधात हे गुन्हे दाखल झाले होते. मात्र कंत्राटदार कंपनी आरएजेव्हीविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.

आता चौकशी अहवालातून या अपघातास कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून कंपनीविरोधात तसेच कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी ॲड. सागर देवरे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली आहे. तर एमएमआरडीएनेही कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अपघातानंतर मी तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपकंत्राटदाराच्या छोट्या – मोठ्या कर्मचारी – अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता कंत्राटदारावर ठपका ठेवण्यात आल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे ॲड देवरे यांनी सांगितले.