मुंबई : गेल्या १४ फेब्रुवारी रोजी मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा कठडा (पॅरापेट) कोसळून अपघात झाला होता. हा अपघात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि इटालियन कंपनी अस्ताल्डी यांच्या संयुक्त उपक्रमातील (आरएजेव्ही) कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे झाल्याचा ठपका मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे.
त्याचप्रमाणे, ही दुर्घटना आरेखन (डिझाइन) किंवा साहित्यातील कोणत्याही त्रुटीमुळे नाही, तर कठड्याचा तात्पुरता आधार काढल्यामुळे घडल्याचा निष्कर्षही चौकशी समितीने अहवालात नोंदवला आहे. या अपघातानंतर मुंबईत काम सुरू असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पांच्या संरचनात्मक सुरक्षा तपासणीच्या मागणीसाठी वकील रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती.
त्यावर मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एमएमआरडीएला प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, एमएमआरडीएच्या विशेष सुरक्षा तपासणी समितीने तपास अहवाल तयार केला. या अहवालानुसार, मार्गिकेच्या या भागाच्या कामात कोणतीही संरचनात्मक कमतरता, सामग्रीतील दोष किंवा कारागिरीतील त्रुटी नव्हती.
तर आरएजेव्हीने नियुक्त केलेल्या एका वेल्डरने नुकत्याच बांधलेल्या सिमेंटच्या कठड्याचे तात्पुरते आधार हे या जागी सिमेटने जोडणी करण्याआधीच नकळतपणे काढून टाकले. त्यामुळेच हा अपघात झाला आणि हेच या अपघाताचे मूळ कारण असल्याचे समितीने अहवालात प्रामुख्याने नमूद केले आहे.सुमारे १.८ टन वजनाचा, सहा फूट बाय चार फूट आकाराचा कठडा १३ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड अग्निशमन केंद्राजवळ उभारण्यात आला होता.
तथापि, दुसऱ्या दिवशी, सिमेंटने त्याची जोडणी करून तो भाग पूर्णपणे सुरक्षित करण्यापूर्वीच त्याचा तात्पुरता आधार काढून टाकण्यात आला आणि परिणामी कठड्याचा मोठा भाग एलबीएस मार्गावरील वाहतुकीवर कोसळला, असेही अहवालात म्हटले आहे.
पर्यवेक्षणातील त्रुटींवर बोट
कार्यपद्धतीचे पालन न करणे, असुरक्षित वर्तन आणि पर्यवेक्षणाचा अभाव यासह अनेक चुकांसाठी आरएजेव्हीला चौकशी अहवालात थेट जबाबदार धरण्यात आले आहे. आधार काढण्यापूर्वी कोणतीही लेखी परवानगी नव्हती, कोणतीही जोडणी तपासणी किंवा अभियांत्रिकी पडताळणी झाली नव्हती. तसेच, तोडणीचा क्रम पाळला गेला नव्हता. संरचनात्मकदृष्ट्या पूर्ण झालेले भाग आणि अपूर्ण भाग यांच्यात फरक करण्यासाठीची कोणतीही प्रणाली अस्तित्वात नव्हती, परिणामी, नकळतपणे कठडे सुरक्षित करण्यापूर्वीच त्याचे आधार काढले गेले, असा निष्कर्ष एमएमआरडीएच्या चौकशी समितीने अहवालात नोंदवला.
कारवाईचा बडगा
पथकाला घटनास्थळाच्या पर्यवेक्षणातही त्रुटी आढळल्या. पर्यवेक्षकाच्या योग्य सूचनांच्या अभावामुळे जोडणी केलेले आणि न केलेले कठड्याचे भाग वेल्डर ओळखू किंवा त्यात फरक करू शकला नसावा, असेही अहवालात म्हटले आहे. अपघाताच्या वेळी घटनास्थळी कंपनीचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, हे लक्षात घेऊन एमएमआरडीएने या त्रुटींसाठी आरजेव्हीराजववर पाच कोटी, तर सल्लागार असलेल्या डीबी, हिल इंटरनॅशनल आणि लुई बर्जर यांच्या समूहाला एक कोटी रुपये दंड ठोठावला. याशिवाय, १८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.
पुनरावृत्ती न होण्यासाठीच्या शिफारशी
या अहवालात प्रकल्पासाठी जबाबदार असलेले संपूर्ण पथक बदलण्याची आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुधारणात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे,
