मुंबई : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा कठडा (पॅरापेट) कोसळून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिंकांचे सुरक्षाविषयक सर्वेक्षण करा, अशी मागणी शुक्रवारी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.
वकील रुजू ठक्कर यांनी ही जनहित याचिका केली असून मुलुंड येथील अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावेत. तसेच भीषण अपघातानंतरही संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का सुरू करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मागण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय मुलुंड येथील अपघातग्रस्त ठिकाणावरील काम तात्काळ थांबवून त्याचे सुरक्षाविषयक सर्वेक्षण करावे आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची मागणी देखील ठक्कर यांनी केली आहे.
मुलुंड येथील अपघातस्थळाजवळून जाणारा रस्ता घाटकोपर, ठाणे आदी भागांना जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे. आपण आणि आपले बहुतांश नातेवाईक या परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु, या अपघातानंतर मेट्रोच्या पुलाखालून, प्रवास करताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, तसेच परिसरातील अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असेही याचिकाकर्तीने याचिकेत म्हटले आहे. अपघातात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईचा तपशील सादर करण्याची मागणीही ठक्कर यांनी केली आहे.
एलबीएस रोड, मुलुंड येथे १४ फेब्रुवारी रोजी मेट्रो ४ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबावरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा कठडा (पॅरापेट) खालून जाणाऱ्या एक रिक्षा आणि मोटारगाडीवर कोसळला होता. यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाले होते.
